OBC reservation : राज्यात मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. यावर राज्य सरकारने शिंदे समिती स्थापन करुन अभ्यास करण्याचे अश्वासन दिले आहे. तसंच ज्याच्याकडे वंशावळ आहे. त्यांना कुणबीचे दाखले देण्याचे आदेश दिले होते. यावरुन ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देवू नये, अशी मागणी केली आहे.
सरकारच्या भूमिकेच्या विरोधात अहमदनगरमधील ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीने मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही. परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये. महाराष्ट्र शासनाने मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत अडचणी येत आहेत. त्यात सुसूत्रता आणण्याच्या उद्देशाने समिती स्थापन केल्याचे दिसून येत आहे यावरून असे दिसून येते की,सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा घाट महाराष्ट्र सरकारने घातलेला आहे.
ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देवू नये या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालेमठ यांना देण्यात आले. याप्रसंगी ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ओबीसी समाजाच्या विविध संघटना ओबीसी व्हीजे एन टी जनमोर्चा, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, बारा बलुतेदार महासंघ, अखिल भारतीय माळी महासंघ, जय भगवान महासंघ, श्री नामदेव शिंपी समाज उन्नती ट्रस्ट, नाभिक समाज महामंडळ, श्री संत गाडगेबाबा धोबी परीट महासंघ, मुस्लिम ओबीसी समाज, लाड सुवर्णकार समाज, स्वकुळ साळी समाज, सुतार पांचाळ समाज, श्री संत गोरोबा कुंभार समाज, समस्त काशी कापडी समाज, श्री संत सावता माळी युवा संघ, फुले ब्रिगेड, अखिल भारतीय ओबीसी महासभा, बहुजन वंचित आघाडी सह वरील सर्व संघटनाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.