परराज्यातील टोळीने कृषी सेवा केंद्रही सोडले नाही; काही तासांत टोळी गजाआड

MIDC Police-सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासातून चोरीमध्ये उत्तर प्रदेशातील तिघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

MIDC

MIDC

अहिल्यानगर : अहिल्यानगर तालुक्यातील देहरे येथील सोहम अॅग्रो सर्व्हिसेस या कृषी सेवा केंद्राच्या मागील बाजूचा पत्रा उचकटून चोरी झाली होती. ही चोरी करणारी उत्तर प्रदेशातील तिघांची टोळी एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद केली. आरोपींकडून चोरीला गेलेला संगणक, बॅटरी आणि रोख रक्कम असा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

इम्रान साहिद कुरेशी (वय २९, रा. मातावली गल्ली, जे.के. हॉस्पिटलजवळ, रामबाग, यमुना ब्रिज, ता. ऐत्मादपूर, जि. आग्रा), आकाश ऊर्फ विकी अशोक तोमर (वय ३०, रा. खंदारी नाका, हरी पर्वत, ता. सदर, जि. आग्रा) आणि बॉबी विजय पाल (वय ३३, रा. महुली कॉलनी रोड, नरोली पुल, ता. महावल, जि. मथुरा), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

सोहम अॅग्रो सर्व्हिसेसचे संचालक विकास भाऊसाहेब काळे (वय 44, रा. देहरे, ता. जि. अहिल्यानगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. 19 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ ते २० सप्टेंबर रोजी सकाळी नऊच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर डेल कंपनीचा संगणक, बॅटरी तसेच ड्रॉवरमधील रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला होता.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.

सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासातून चोरीमध्ये उत्तर प्रदेशातील तिघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यांची नावे इम्रान साहिद कुरेशी (वय २९, रा. मातावली गल्ली, जे.के. हॉस्पिटलजवळ, रामबाग, यमुना ब्रिज, ता. ऐत्मादपूर, जि. आग्रा), आकाश ऊर्फ विकी अशोक तोमर (वय ३०, रा. खंदारी नाका, हरी पर्वत, ता. सदर, जि. आग्रा) आणि बॉबी विजय पाल (वय ३३, रा. महुली कॉलनी रोड, नरोली पुल, ता. महावल, जि. मथुरा) अशी आहेत. आरोपी चोरीचा मुद्देमाल घेऊन अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपी परराज्यातील असल्याने एमआयडीसी पोलिसांनी महामार्ग पोलीस केंद्र, बाभळेश्वर यांच्याशी तातडीने संपर्क साधला. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने आरोपींचा माग काढत महामार्ग पोलिसांच्या मदतीने तिघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपींनी गुन्ह्यात सहभाग असल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेला संगणक, बॅटरी आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक राकेश खेडकर करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हेमंत थोरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मनोहर खिळदकर, राकेश खेडकर, शैलेश रोहोकले, राजू सुद्रिक, राहुल गुंडू, संपद खेडकर, यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच महामार्ग पोलीस केंद्र, बाभळेश्वर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Exit mobile version