शेतकऱ्याला रस्त्यात अडवत अमानुष मारहाण, लघवी पाजली, व्हिडिओ काढला; अहिल्यानगरमध्ये गोरक्षकांचा उच्छाद !
Ahilyanagar: प्रतिक पाचपुते व त्याच्या साथीदारांनी शेतकरी विजय शेळके आणि ड्रायव्हर महेश जाधव यांना लोखंडी टामी व काठ्यांनी अमानुष मारहाण केली.
अहिल्यानगर: गोरक्षणाच्या नावाखाली अहिल्यानगरमधील श्रीगोंदा तालुक्यात गोरक्षकांनी घृणास्पद प्रकार केला आहे. गावरान गाय खरेदी करून गावी घेऊन जाणाऱ्या एका शेतकऱ्याला व पिकअपला चालकाला रस्त्यावर अडवून बेदम मारहाण करून त्यांना लुटण्यात आले. त्यानंतर दोघांना बळजबरी लघवी पाजून त्याचा व्हिडिओ शूट करण्यात आलाय. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आष्टीतील गोरक्षक प्रतिक गोकुळराव पाचपुतेसह पंधरा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील गुणवडी येथील शेतकरी विजय भाऊसाहेब शेळके यांनी टाळी लोणार येथे एक गावरान गाय आणि तिची कालवड खरेदी केली होती. त्यासाठी त्यांनी 14 हजार रुपये दिले होती. ही गाय व कालवड घेऊन ते महेश संदीप जाधव यांच्या पिकअप वाहनातून घरी जात होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पारी काळ्या रंगाच्या स्प्लेंडरवरून आलेल्या दोन दोघांनी त्यांची गाडी अडवली. त्यांनी लाकडी काठी आणि लोखंडी गजाने मारहाण करत गाय व रोख रकमेची मागणी केली. शेतकऱ्याने विरोध करताच इतरांना बोलवून घेतले. काही वेळातच विनानंबरच्या काळ्या रंगाच्या कारमधून व मोटारसायकलमधून 10 ते 15 जणांचे टोळके घटनास्थळी धडकले.
प्रतिक पाचपुते व त्याच्या साथीदारांनी शेतकरी विजय शेळके आणि ड्रायव्हर महेश जाधव यांना लोखंडी टामी व काठ्यांनी अमानुष मारहाण केली. प्रतिक पाचपुते याने 50 हजार रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने शेळके यांच्या खिशातील 21 हजार रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून घेतली. त्यानंतर आरोपींनी दोघांचे कपडे काढून पाण्याच्या बाटलीत लघवी केली. ती बळजबरीने त्यांच्या तोंडात पाजली, या सर्व पाशवी कृत्याचा आरोपींनी स्वतःच्या मोबाईलमध्ये व्हिडिओसुद्धा शूट केला.
मैत्रीच्या जाळ्यात ओढून तरुणीवर अत्याचार; फोटो-व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग
घटनेनंतर जखमींना तातडीने श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पीडित शेतकरी विजय शेळके यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात प्रतिक पाचपुते, मोटरसायकलवरील दोघे जण आणि इतर 10 ते 15 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर करत आहेत. प्रतिक पाचपुते हा गोरक्षक म्हणून परिसरात दहशत करतो. त्याच्याविरोधात यापूर्वी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.