बहादूरगडाचे ‘धर्मवीर गड’ नामकरण, आता राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा; विक्रम पाचपुतेंच्या पाठपुराव्याला यश

सांस्कृतिक कार्य विभागाने 7 सप्टेंबर रोजी शासन निर्णय जारी करत धर्मवीर गडाला ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केले आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 07T181437.783

Renaming of Bahaduragad to ‘Dharmavir Gad’ : छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रमाची आणि बलिदानाची साक्ष देणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील ‘धर्मवीर गड’बाबत राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाने 7 सप्टेंबर रोजी शासन निर्णय जारी करत धर्मवीर गडाला ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केले आहे. या निर्णयामुळे ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या गडाचे जतन, संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

धर्मवीर गडाच्या जतन आणि संवर्धनासाठी भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. यापूर्वी त्यांच्या मागणीनुसार पेडगाव येथील ऐतिहासिक ‘बहादूरगडाचे’ अधिकृत नामकरण ‘धर्मवीर गड’ असे करण्यात आले होते. त्यानंतर गडाला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळावा, यासाठीही त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले होते. आता राज्य सरकारने त्यासंदर्भात निर्णय घेतल्याने त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.

धर्मवीर गडाला छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतिहासानुसार संगमेश्वर येथे मुघलांनी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना पकडल्यानंतर त्यांना पेडगावच्या या गडावर आणण्यात आले होते. याच ठिकाणी संभाजी महाराजांवर मुघलांकडून अनन्वित अत्याचार करण्यात आल्याचे ऐतिहासिक संदर्भ सांगतात. त्यामुळे हा गड छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, संघर्ष आणि बलिदानाच्या स्मृतींशी जोडला गेला आहे.

आता थेट चंद्रावर अमेरिकेचा दावा, ट्रम्प यांच्या ‘चंद्र आपला आहे’ पोस्टने खळबळ, स्पेस फोर्सचा नवा लूकही चर्चेत

गडाचे महत्त्व केवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासापुरते मर्यादित नसून, येथे प्राचीन स्थापत्यकलेचा समृद्ध वारसाही पाहायला मिळतो. गड परिसरात यादवकालीन स्थापत्यशैलीचे दर्शन घडवणारी रामेश्वर, भैरवनाथ, मल्लिकार्जुन, लक्ष्मीनारायण, बाळेश्वर आणि पाताळेश्वर ही प्राचीन मंदिरे आहेत. या वास्तू ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जातात.

महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम, 1960 अंतर्गत सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भात दोन महिन्यांची प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या प्रक्रियेत एकूण 3 लाख 77 हजार 300 चौरस मीटर क्षेत्र संरक्षित करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामध्ये रामेश्वर मंदिर, भैरवनाथ मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, ऐतिहासिक वाडे तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचा समावेश आहे.

राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाल्यामुळे धर्मवीर गडाच्या ऐतिहासिक वास्तूंचे शास्त्रीय पद्धतीने जतन आणि संवर्धन करण्यास चालना मिळणार आहे. त्याचबरोबर गड परिसराचा विकास आणि सुशोभीकरण करण्यासाठीही पुढील प्रक्रिया राबवता येणार आहे. आमदार विक्रम पाचपुते यांनी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणीही राज्य सरकारकडे लावून धरली आहे. त्यामुळे आगामी काळात धर्मवीर गडाचा ऐतिहासिक वारसा जपण्याबरोबरच हे ठिकाण महत्त्वाचे ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

follow us