केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट; कटात रितेश हिंगेचा सहभाग निष्पन्न, 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

या प्रकरणात रितेश हिंगे याचा खुनाच्या कटात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 07T170604.853

Major update in the Ketan Agrawal murder case : केतन अग्रवाल खून प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर आली असून, या प्रकरणात रितेश हिंगे याचा खुनाच्या कटात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली. रितेश हिंगे हा या प्रकरणातील आरोपी चेतन चौधरीचा जवळचा मित्र असून, त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणातील तो तिसरा आरोपी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी सांगितले की, कोणत्याही व्यक्तीला अटक करताना त्यासाठी आवश्यक असलेले पुरावे आणि कायदेशीर आधार पूर्ण करणे गरजेचे असते. या प्रकरणात नोंदवण्यात आलेले जबाब तसेच तांत्रिक पुराव्यांच्या आधारे माहिती गोळा करण्यात आली. त्यानंतर रितेश हिंगे याची चौकशी केली असता पोलिसांना त्याच्या सहभागासंदर्भात पुरावे आढळून आले. त्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

पोलिसांच्या तपासानुसार मुख्य आरोपी सिया आणि चेतन यांनी केतन अग्रवाल यांच्या खुनाचे नियोजन केले होते. या नियोजनाची माहिती चेतन चौधरी सुरुवातीपासूनच त्याचा जवळचा मित्र रितेश हिंगे याला देत होता, असे तपासातून समोर आले आहे. चेतनच्या चौकशीदरम्यान रितेशचे नाव समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले होते आणि त्याने तपासात सहकार्यही केले होते. रितेश हा चेतनचा जवळचा मित्र असून, तो सियालाही ओळखत असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

नृत्यांगना राधा पाटीलसह मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा; परवानगी न घेता पुण्यात कार्यक्रम

केतन अग्रवाल यांचा खून झाल्यानंतर आरोपी चेतन हा रितेशला जाऊन भेटला होता. या भेटीत चेतनने खुनाबाबतची संपूर्ण हकीकत रितेशला सांगितल्याची माहितीही तपासातून समोर आली आहे. मात्र, प्रत्यक्ष खून झाला त्यावेळी रितेश घटनास्थळी उपस्थित होता की नाही, याबाबत अद्याप तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक गिल यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणाचा लोहगड परिसराशी असलेला संबंधही पोलीस तपासत आहेत. घटनेच्या अनुषंगाने लोहगडावर उपस्थित असलेल्या काही व्यक्तींचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. रितेश यापूर्वी लोहगडावर गेला होता का, खुनाच्या वेळी किंवा त्याआधी तेथे आणखी कोण उपस्थित होते आणि या संपूर्ण कटामध्ये अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.

सध्याच्या तपासात सिया आणि चेतन या दोघांनी खुनाचे नियोजन केल्याचे तसेच रितेशचा या कटात सहभाग असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र, या तिघांव्यतिरिक्त आणखी कोणाचा सहभाग असल्याचे सध्या तरी तपासात समोर आलेले नाही. रितेशला 12 सप्टेंबरपर्यंत मिळालेल्या पोलीस कोठडीदरम्यान त्याच्याकडून आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार असून, पुढील तपासातून या खून प्रकरणातील आणखी बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

follow us