नृत्यांगना राधा पाटीलसह मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा; परवानगी न घेता पुण्यात कार्यक्रम

Radha Patil : लावणी नृत्यांगणा राधा पाटील, एम्पायर ग्रुप ए के बॉइजचे अध्यक्ष भुषण अभिमान सोनवणे, आयोजक अमोल काटे यांच्याविरुद्ध गुन्हा.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Radha Patil

पुणे : दहिहंडी उत्सवासाठी परवानगी न घेता नृत्याचा कार्यक्रम केल्याप्रकरणी पुण्यात एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रसिद्ध लावणी नृत्यांगना राधा पाटीलसह (Radha Patil) दहिहंडी (Dahi Handi) उत्सव आयोजक मंडळाचे अध्यक्ष व आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

लावणी नृत्यांगणा राधा पाटील (रा. मुंबई), एम्पायर ग्रुप ए के बॉइजचे अध्यक्ष भुषण अभिमान सोनवणे (रा. अंबामाता मंदिराजवळ, सुखसागरनगर, भाग 1, कात्रज) आणि आयोजक अमोल काटे (रा. कात्रज) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस कर्मचारी नंदलाल हरिचंद्र भादले यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नृत्याचा कार्यक्रम सादर करताना अश्लिल नृत्य सादर होऊ नये, यासाठी सहभागी होणार्‍या कलाकारांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली होती. या आदेशानुसार प्रमाणपत्र सादर न केल्याने मंडळाला कार्यक्रमाची परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

दहीहंडी उत्सवासाठी एम्पायर ग्रुप ए के बॉइजचे अध्यक्ष भूषण सोनवणे यांनी लावणी नृत्यांगणा राधा पाटील यांच्या लावणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी परवानगी मिळण्यासाठी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अर्ज सादर केला होता. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील कला, लोककला, चित्रपट व सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित विषयाबाबत रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ यांचे रंगभूमी मंडळांची कार्यपद्धती तसेच अनुसरावयाची सर्वसाधारण तत्वे निश्चितीबाबत व त्याप्रमाणे मंडळाचे कार्य चालणे बाबत पोलीस प्रशासनाला पत्र मिळाले होते. या पत्रान्वये भूषण सोनवणे यांना कार्यक्रमाचे अनुषंगाने विहीत नमुन्यामध्ये परवानगीसाठीची कागदपत्रे सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. परंतु, मंडळाचे अध्यक्ष, आयोजक तसेच प्रत्यक्ष कार्यक्रम सादर करणार्‍या लावणी नृत्यांगणा राधा पाटील यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्राधिकृत कागदपत्रे किंवा प्रमाणपत्र सादर न केल्याने बिबवेवाडी पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.

follow us