मित्राच्या लग्नाला गेला, दोन दिवसांनी सौताड्याच्या नदीपात्रात मृतदेह ; जामखेडच्या शुभम डाडरचा संशयास्पद मृत्यू

Shubham Dadar : मित्राच्या लग्नाला जातो असे सांगून घराबाहेर पडला... काही तासांतच मोबाईल बंद झाला... कुटुंबीयांचा संपर्क तुटला

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Shubham Dadar

Shubham Dadar : मित्राच्या लग्नाला जातो असे सांगून घराबाहेर पडला… काही तासांतच मोबाईल बंद झाला… कुटुंबीयांचा संपर्क तुटला आणि दोन दिवसांच्या शोधानंतर थेट सौताड्याच्या नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळला जामखेड येथील ३० वर्षीय शुभम बाळू डाडर याच्या मृत्यूने जामखेडसह बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शुभमचा मृत्यू नेमका कसा झाला तो सौताड्याच्या नदीपात्रात पोहोचलाच कसा त्याच्यासोबत काही घातपात झाला की त्याने आत्महत्या केली असे अनेक प्रश्न या घटनेने उपस्थित केले आहेत. या तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले असून, शवविच्छेदन अहवाल आणि पोलिस तपासातूनच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. जामखेड शहरातील सदाफुले वस्ती येथील रहिवासी असलेला शुभम बाळू डाडर हा गुरुवारी, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास मित्राच्या लग्नासाठी आष्टी येथे जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला होता. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्याच्या आईने फोन करून विचारपूस केली असता आपण मित्राच्या लग्नात असल्याचे आणि लवकरच घरी परतणार असल्याचे त्याने सांगितले होते. त्यामुळे कुटुंबीयही निश्चिंत होते काही तासांतच परिस्थिती बदलली आणि एका कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकवणारा घटनाक्रम सुरू झाला.

दुपारी फोन उचलला नाही, नंतर मोबाईल बंद

गुरुवारी दुपारी चार वाजल्यानंतर शुभमचा भाऊ नागेश याने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, शुभमने फोन उचलला नाही. काही वेळाने त्याचा मोबाईल बंद लागल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. मित्रपरिवार, नातेवाईक आणि परिचितांकडे चौकशी करूनही शुभमचा ठावठिकाणा लागला नाही. लग्नासाठी गेलेला तरुण अचानक गायब झाल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. मात्र, दोन दिवस उलटूनही त्याचा काहीच पत्ता लागत नव्हता. अखेर शुभमला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणातून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत त्याच्या आईने जामखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी बेपत्ता होण्याच्या घटनेची नोंद घेऊन अपहरणाच्या संशयासह तपास सुरू केला होता. कुटुंबीयांना शुभम सुखरूप परत मिळेल, अशी आशा होती समोर आलेल्या घटनेने या आशेवर पाणी फिरले.

सौताड्याच्या नदीपात्रात मृतदेह; ओळख पटताच नातेवाइकांना धक्का

शनिवारी, १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील नदीपात्रात एक मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच संबंधितांनी पोलिसांना कळविले. पोलिसांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटविण्याची प्रक्रिया करण्यात आली असता, तो जामखेड येथून बेपत्ता झालेल्या शुभम बाळू डाडर याचाच असल्याचे निष्पन्न झाले. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह थेट सौताडा येथील नदीपात्रात आढळल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. ज्या मुलाचा शोध घेण्यासाठी आई-वडील, भाऊ आणि नातेवाईकांची धावपळ सुरू होती, त्याच मुलाच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे जामखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रितेश देशमुखचा तेलुगू सिनेमात ग्रँड डेब्यू; #RAPO23 च्या सेटवर जंगी स्वागत-

घातपात की आत्महत्या ; मृत्यूभोवती प्रश्नांचे काहूर

शुभम घरातून मित्राच्या लग्नासाठी निघाला होता. त्याने आईशी फोनवर संवादही साधला होता. त्यानंतर काही तासांतच त्याचा संपर्क तुटला आणि दोन दिवसांनी त्याचा मृतदेह दुसऱ्या तालुक्यातील नदीपात्रात आढळला. या घटनाक्रमामुळे शुभमच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याचा मृत्यू अपघाती झाला, त्याने आत्महत्या केली की त्याच्यासोबत काही घातपात झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. शुभमच्या मृत्यूमागचे नेमके कारण काय, तो सौताडा येथील नदीपात्रात कसा पोहोचला आणि त्याच्या बेपत्ता होण्यामागे काही संशयास्पद घटना आहे का, या प्रश्नांची उत्तरे पोलिस तपासातून मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे. पाटोदा पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, शवविच्छेदन अहवालासह इतर पुराव्यांच्या आधारे मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.मित्राच्या लग्नासाठी घरातून बाहेर पडलेल्या शुभमचा प्रवास अखेर मृत्यूने संपला. मात्र, त्याचा मृत्यू नेमका कसा झाला, याचे गूढ अद्याप कायम आहे. एका तरुणाच्या मृत्यूमुळे कुटुंबाचा आधार हरपला असून, या प्रकरणातील सत्य समोर येण्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us