आता ढेकळांचे पंचनामे करायचे का? कृषिमंत्री कोकाटेंच्या वक्तव्याची तुफान चर्चा

कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करुन काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? असा सवाल मंत्री कोकाटे यांनी विचारला.

Manikrao Kokate

Manikrao Kokate

Nashik News : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सतत काहीनाकाही विधाने करुन चर्चेत राहत असतात. आताही त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करुन काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? असा सवाल मंत्री कोकाटे यांनी विचारला. मुसळधार पावसामुळे सिन्नर बसस्थानकाच्या छताचा काही भाग कोसळला. याची पाहणी केल्यानंतर कोकाटे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुसळधार पावसामुळे राज्यात शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांची पाहणी करुन पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे. मंत्री प्रशासनासह शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करत आहेत. शेतातून काढून ठेवलेल्या आणि काढणीवर आलेल्या अशा दोन प्रकारच्या कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. शासकीय यंत्रणा मात्र फक्त  उभ्या पिकांचेच पंचनामे करत असल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. या तक्रारींवर कोकाटे यांनी उत्तर दिले.

मोठी बातमी! आता शेतीत दरवर्षी 5 हजार कोटींची भांडवली गुंतवणूक; कृषिमंत्री कोकाटेंची घोषणा

नाशिक जिल्ह्यात सात हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यातील निम्मे पीक कांद्याचेच आहे. यामध्ये शेतातून काढून खळ्यात आणि चाळीत ठेवलेल्या कांद्याचाही समावेश आहे. या पिकाचेही पावसाने मोठे नुकसान केले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार शेतातील उभ्या पिकांना नुकसानीपोटी भरपाई मिळते. कापणी झालेल्या पिकांना मिळत नाही. त्यामुळे या पिकांचं नुकसान शेतकऱ्यांनाच सहन करावं लागणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

नेमकं काय म्हणाले कृषिमंत्री

हार्वेस्टिंग झालेलं आहे तिथे पंचनामे करुन काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? ज्यांचे कांदे वावरात आहे त्याचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवलेत त्यांचे पंचनामे करता येणार नाहीत. त्या पिकांचे पंचनामे करता येणे अवघड आहे. नियमात बसत नाही. पिक काढून शेतातच असेल, शेतातच कांदा असेल तर त्याचे पंचनामे करता येतील. शेतात जे काही पिक असेल त्यांचे रितसर पंचनामे होतील.

अवकाळीचा फटका! अहिल्यानगर जिल्ह्यात कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी

कांदा साठवणुकीतील अडचणी

मे महिन्यातील अवकाळी पावसाने जिल्ह्यातील अनेक परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. चांगला भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी कांदा चाळींमध्ये साठवून ठेवला होता, पण सततच्या पावसामुळे आणि वातावरणातील आर्द्रतेमुळे कांद्याला बुरशी लागण्याचा धोका वाढला आहे. कांदा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना चाळीतील कांदा बाहेर काढून निवडून पुन्हा साठवावा लागत आहे. ही प्रक्रिया खर्चिक आहे, कारण मजुरांचे दर वाढलेले आहेत. यामुळे कांदा साठवणुकीमध्ये देखील अडचण येत आहे.

Exit mobile version