नाशिक – महाविकास आघाडीचे सरकार कोसळले त्या घटनेला आता एक वर्ष पूर्ण होईल. मात्र त्या घटनेचे पडसाद अजूनही राज्याच्या राजकारणात उमटत असतात. राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली की हा मुद्दा चर्चेत येतो. आताही नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे सरकार कशामुळे कोसळले यावर राजकीय नेत्यांकडून टीका टिप्पणी सुरू आहे. या मुद्द्यावर शिवसेनेनंतर (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांकडूनही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि नाना पटोले यांच्यातील वादावर भाष्य केले आहे.
महाविकास आघाडीच्या काळात नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीना्ना दिला. त्यावेळी त्यांनी कुणालाही विश्वासात घेतले नाही. त्यानंतर इतर अडचणी निर्माण झाल्या आणि सरकार कोसळले, असे भुजबळ म्हणाले. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, की पटोले यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होऊ शकला नाही. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. नाना पटोले यांनी राजीनामा दिला नसता तर कदाचित या सगळ्या घटना घडल्या नसत्या.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात वाद होता. नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर मात्र हा वाद जास्त उफाळून आला. सत्यजित तांबे यांना पटोले यांनी जाणूनबुजून तिकीट नाकारले, असा आरोप थोरात-तांबे कुटुंबियांनी केला होता. या वादात शिवसेनेने थोरात यांची बाजू घेतली होती. इतकेच नाही तर खुद्द पटोले यांच्याच पक्षातील विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर या नेत्यांनी सुद्धा पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या मुद्द्यावर टीका केली होती.