’50 लाख रुपये द्या, अन्यथा तुमच्यावर मोक्का लावू’…नगर तालुका पोलिसांची थेट शरद पवारांना धमकी?

आम्हाला 50 लाख रुपये द्या, अन्यथा मोक्का लावू, अशी धमकी तालुका पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली असल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे.

Nagar Taluka Police

Nagar Taluka Police

Sharad Pawar News : आम्हाला 50 लाख रुपये दे नाही तर तुझ्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्याची थेट धमकी दिली असल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अहिल्यानगर तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांवर केला आहे. या प्रकरणी मी दोषी असेल तर माझ्यावर करावी. मात्र, मला 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शरद पवार यांनी निवेदनाद्वारे पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्याकडे केलीयं.

यासंदर्भातील व्हिडिओ शरद पवार यांनी व्हायरल केला असून व्हिडिओमध्ये बोलताना शरद पवार यांंनी पोलिस अधिकाऱ्यांवर खंडणीचे आरोप केले आहेत. काही महिन्यांपूर्वी माझ्यावर पोलिसांनी खोटा अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यामध्ये खासदार निलेश लंके यांचं नाव घेण्यासाठी माझ्यावर पोलिस दबाव टाकत होते. तसेच आम्हाला 50 लाख रुपये द्या, नाही तर आम्ही तुझ्यावर मोक्कांतर्गत कारवाई करणार असल्याची धमकीही दिली असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय.

तसेच माझ्यावर मोक्कांतर्गत कारवाईसाठी राजकीय नेते, मंत्र्यांचे पीए दबाव टाकत असून चिंचोंडी पाटील गावातील आमच्या विरोधकांना हाताशी धरुन कट कारस्थाने रचत आहेत. यासंदर्भातील सबळ पुरावे अर्थात मंत्र्यांच्या पीएच्या रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचा दावाही शरद पवार यांनी केला असून माझ्यावरील अपहरणाच्या खोट्या गुन्ह्याचा कुठलाही पुरावा पोलिसांना आढळून आलेला नसून पोलिसांनी हा खोटा गुन्हा आपल्यावर दाखल केला असल्याचाही आरोप शरद पवार यांनी केला आहे.

दरम्यान, राजकीय विरोधातून आपल्याला लक्ष्य केले जात असून, खोटे गुन्हे दाखल करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावाही शरद पवार यांनी केला आहे. या कथित प्रकारामुळे आपल्यासह कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. संबंधित आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे.

Exit mobile version