Jayant Patil : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांतून लोक बाहेर जातात पण त्यांना तिकडं करमत नाही. आमच्यातले बरेच आमदार भाजपात गेले आहेत. भारतीय जनता पार्टीचे 105 आमदार आहेत पण तसे पाहिले तर 60 ते 70 आमदारांइतकीच भाजपची ताकद आहे. त्यापेक्षा जास्त नाही. बाकीचे सगळे पळवून आणलेले उधारीवर आणलेले आमदार आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भारतीय जनता पार्टीची (BJP) खिल्ली उडवली. आता पुढील वर्ष दीडवर्षात जे पक्ष सोडून गेले आहेत. त्यांना परत येण्याची भावना तयार होईल त्या सर्वांचे स्वागत करण्यासाठी आता आम्ही तयार आहोत, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
आक्रमक भाजप नेत्यांची ‘तलवार’ अचानक म्यान; फडणवीस-बावनकुळेंची कार्यकर्त्यांना तंबी
पाटील पुढे म्हणाले, आता महाराष्ट्रात वारं बदलायला लागलं आहे. राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येणार असे आता लोकांना वाटत आहे. म्हणून आमचा पक्ष, काँग्रेस आणि फार शिवसेना या पक्षांतून तिकडे गेलेले जे आमदार आहेत ते आता द्विधा मनस्थितीत आहेत. त्यांना आता परत घरी यायचे अशी भूमिका त्यांच्या मनातली आहे. ज्ञानेश्वर आबा तुमचं पक्षात स्वागत करतो. पण, आता पुढील वर्ष दीडवर्षात जे पक्ष सोडून गेले आहेत. त्यांना परत येण्याची भावना तयार होईल त्या सर्वांचे स्वागत करण्यासाठी आता आम्ही तयार आहोत, असे पाटील म्हणाले.
दरम्यान, आता राज्यात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. पक्षप्रवेशाचेही सोहळे सुरू झाले आहेत. त्यामुळे फोडाफोडीचे राजकारणही आगामी काळात जोरात सुरू राहणार आहे. या पार्श्वभुमीवर जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे.