अहमदनगर : देवीभोयरे (ता. पारनेर) येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या (Parner Cooperative Sugar Factory) 25 एकर जमीन अदलाबदल गैरव्यवहार प्रकरण (Land Swap Misappropriation Case)राज्यभर गाजले होते. या प्रकरणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhe Patil) यांच्या समोर गुरुवारी (ता.23) सुनावणी ठेवण्यात आली आहे.
याप्रकरणी पारनेर कारखान्याचे अवसायक राजेंद्र निकम, अध्यक्ष क्रांती शुगरचे के. एम. निमसे, दुय्यम निबंधक, पारनेरचे तहसीलदार, निघोजचे मंडळ अधिकारी व देवीभोयरेचे तलाठी यांना नोटिसा बजावल्या आहेत. या गैरव्यवहाराशी संबंध असणाऱ्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. 23) आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.
ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड 125 जागांसाठी भरती
अवसानातील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची सुमारे 25 एकर औद्योगिक बिगर शेती जमीन क्रांती शुगर अँड पॉवर यांना अवसायक राजेंद्र निकम यांनी बेकायदेशीरपणे अदलाबदल करून दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी कारखाना बचाव समितीने आक्षेप घेऊन औरंगाबाद खंडपीठात खटला दाखल केला होता.
उच्च न्यायालयाने महसूल विभागाला याबाबतचा निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार हे प्रकरण राज्याचे महसूल मंत्र्यांकडे दाखल करण्यात आले आहे. अवसायक यांच्या कामकाजाची मुदत जून 2015 ला संपल्यानंतर, अवसायकांनी 2019 रोजी हा अदलाबदल व्यवहार केल्याचा आक्षेप कारखाना बचाव समितीने घेतला आहे. या जमीन अदलाबदलीच्या प्रकरणाचे पुरावे कारखाना बचाव समितीने न्यायालयात सादर केले होते. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवरही आरोप झाले होते.