Ahilyanagar News : पारनेर तालुक्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली एका महिलेची आर्थिक व मानसिक पिळवणूक केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलायं. मतिमंद मुलाचा आजार बरा करून देतो, तसेच भावाचे लग्न जमवून देतो, असे आमिष दाखवत भोंदूबाबाने एका कुटुंबाकडून तब्बल साडेसहा लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. एवढ्यावरच न थांबता, कोणाला काही सांगितले तर तुझ्या मुलाला जिवंत मारून टाकीन, अशी धमकी देत पीडित महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.
दादरच्या मराठी डॉक्टरांची ऐतिहासिक झेप; डॉ. नितीश राऊत ब्रिटनमध्ये महापौरपदी विराजमान
पारनेर तालुक्यातील रुई छत्रपती येथील राजू बन्सी दिवटे, त्याचा मुलगा शशिकांत राजू दिवटे आणि महिला साथीदार शोभा अविनाश तरटे यांनी स्वतःला देवऋषी व देवभगत असल्याचं भासवून देत परिसरातील अनेक लोकांमध्ये विश्वास निर्माण केला होता. कौटुंबिक संकटात अडकलेल्या पीडित महिलेला तुमच्या घराला मांढरदेवीच्या काळुबाईची बाधा असल्याचं सांगून आरोपींनी तिच्या मनात भीती निर्माण केली.
पूजा, होमहवन आणि तंत्र-मंत्र केल्याशिवाय संकट दूर होणार नाही, असे सांगत महिलेला त्यांच्या जाळ्यात ओढण्यात आले. सुरुवातीला पूजा साहित्याच्या नावाखाली दहा हजार रुपये घेतल्यानंतर आरोपींनी पारनेर येथील चौधरी कॉम्प्लेक्समधील घरात काळुबाईच्या फोटोसमोर होमहवन केले. त्यावेळी महिलेला अंगारा व तीर्थ पिण्यास दिले जात होते. मुलाचा आजार बरा करण्यासाठी तीन ते चार लाख रुपये लागतील, तर भावाचे लग्न जमवण्यासाठी आणखी दीड लाख रुपये खर्च येईल, असे सांगून आरोपींनी वेळोवेळी रोख व ऑनलाईन स्वरूपात पैसे घेतले.
कृत्रिम बुद्धीमत्ता माणसाची जागा घेऊ शकत नाही…डॉ. रामचंद्र पवार यांचं प्रतिपादन
कर्ज काढून दिले लाखो रुपये…
जानेवारी २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत पीडित महिलेकडून तब्बल ४ लाख ५६ हजार ६८४ रुपये उकळण्यात आले. तसेच भावाचे लग्न लावून देण्याच्या बहाण्याने आणखी १ लाख ९३ हजार ५३० रुपये घेतल्याचे समोर आले आहे. ही संपूर्ण रक्कम महिलेला फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून द्यावी लागली होती. संकटातून बाहेर पडण्याच्या आशेवर महिलेला अक्षरशः आर्थिक खाईत लोटण्यात आले.
मुलाला मारण्याची धमकी देत केला अत्याचार
आरोपी राजू दिवटे याने तुझ्या मुलाला जिवंत मारून टाकीन, अशी धमकी देत पीडित महिलेवर वारंवार जबरदस्तीने अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. भीतीमुळे महिला अनेक दिवस गप्प राहिली. मात्र सततच्या छळाला कंटाळून अखेर तिने पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. आरोपी विरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाले आहेत.
