Download App

अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आज ठरणार

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (Ahmednagar District Central Cooperative Bank)अध्यक्ष उदय शेळके (Uday Shelke)यांच्या निधनानंतर अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेसाठी आज निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष सभा बोलावण्यात आलीय. या संचालक मंडळात महाविकास आघाडीचं बहुमत आहे. असं असलं तरी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil)काही चमत्कार घडवू शकतात अशीही चर्चा आहे.

24 फेब्रुवारीला बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. तसेच या निवडणुकी संदर्भातील प्रस्ताव सहकार निवडणूक प्राधिकरणाला पाठवण्याचा निर्णय झाला होता. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत महाविकास आघाडीची सत्ता आहे.

सीबीआय सोमय्यांसारख्या लोकांच्या निर्देशाखालीच चालतं; पृथ्वीराज चव्हाणांचा थेट आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसकडं सर्वाधिक नऊ, काँग्रेसकडे तीन, विखे गट व भाजपकडे प्रत्येकी तीन तर शिवसेना पुरस्कृतकडे एक संचालक आहे. महाविकास आघाडीतील पदाच्या वाटाघाटीनुसार अध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्याचे ठरले होते. त्यानुसार उदय शेळके यांना अध्यक्ष करण्यात आले होते. मात्र त्यावेळी राज्यात सत्ता महाविकास आघाडीची होती.

आता राज्यात सत्ता शिंदे गट व भाजपची आहे. भाजपकडे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या सारखे दिग्गज आहेत. असे असले तरी सर्वाधिक संचालक महाविकास आघाडीचे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सीताराम गायकर, चंद्रशेखर घुले, प्रशांत गायकवाड यांचं नाव चर्चेत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात काल (मंगळवारी) अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर होते. अजित पवार यांनी अहमदनगर व पाथर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

त्यामुळं जिल्हा बँकेत पुन्हा राष्ट्रवादीचा अध्यक्ष बनविण्याच्या हलचालींनी वेग घेतलाय. सीताराम गायकर यांनी या पूर्वीही जिल्हा बँकेत अध्यक्षपद भूषविलेले आहे. चंद्रशेखर घुले हे पक्षाबरोबरच नव्या नातेसंबंधामुळं प्रबळ दावेदार समजले जात आहे.

Tags

follow us