Download App

कर्नाटक विधानसभा निवडणूक; अहमदनगरच्या काँग्रेस कार्यालयाला पोलिसांचा पहारा

Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकांची जोरदार (Karnataka Elections) रणधुमाळी सुरू आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडूनही तुफान प्रचार सुरू आहे.कर्नाटकसाठी काँग्रेसने घोषणापत्र जारी केले होते. या निवडणूक जाहीरनाम्यात काँग्रेसने बजरंग दलाची (Bajrang Dal) तुलना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी (Popular Front of India) केली होती. तर कर्नाटकात सरकार आले तर बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन कॉंग्रेसने दिले होते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर बजरंग दल आणि भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगरच्या काँग्रेस (Ahmednagar Congress) कार्यालयाला पोलिसांचा पहारा लावण्यात आला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. तेथील तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरामध्ये भाजप प्रणित संघटनांच्या वतीने गोंधळ घातला जाण्याची शक्यता आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता कोतवाली पोलीस ठाण्यातर्फे शहर काँग्रेसच्या चितळे रोडवरील शिवनेरी कार्यालयावर पोलिसांचा पहारा लावण्यात आला आहे. शहर पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे यांनी काँग्रेस कार्यालयास भेट देऊन समक्ष पाहणी केली आहे. दरम्यान, कुणी आमच्या अंगावर आल्यास त्यांना शिंगावर घेऊ, असा इशारा युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष प्रवीण गिते यांनी दिला आहे.

नगरकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील पाणीपुरवठा तीन दिवस विस्कळीत

उत्तर प्रदेश, गुजरातसह अनेक राज्यांमध्ये काँग्रेसच्या कार्यालयांवर हल्ले होत आहेत. यामुळे नगर शहरात देखील पोलीस खबरदारी घेत आहेत. युवक काँग्रेसने म्हटले आहे की, लोकशाही आहे. काँग्रेस पक्ष हा सर्वांना बरोबर घेऊन चालणारा पक्ष आहे. अहमदनगर शहरातील काँग्रेस पक्षाची भूमिका ही शहर विकासाची आहे. गुंडगिरी, अन्यायाविरोधातील आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर काँग्रेस कार्यकर्ते काम करतात. त्यामुळे छत्रपतींच्या नावाने असणाऱ्या कार्यालयावर हल्ला करण्याचा कुणी विचार केला, तर त्यांना देखील जशास तसे उत्तर काँग्रेस कार्यकर्ते देतील, असा इशारा गिते यांनी युवक काँग्रेसच्या वतीने दिला आहे.

Tags

follow us