Rohini Khadse : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुलीची काही टवाळखोरांनी छेड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रक्षा खडसेंनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. दरम्यान शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी गंभीर आरोप केला आहे. मुलीची छेड काढणारे आरोपी हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे कार्यकर्ते होते, असा आरोप त्यांनी केला.
रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी सहा टवाळखोरांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. तर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आरोपीला माफी देता कामा नये. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, तसेच खडसेंच्या नातीला छेडणारे एका विशिष्ट पक्षाचे असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
त्यानंतर रोहिणी खडसेंनी आरोपी अनिकेत भोई आणि पियुष मोरे हे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते आहेत, असा दावा केलाय. त्यांनी आरोपी पियुष मोरे यांचे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणि आरोपी अनिकेत भोई यांचे चंद्रकांत पाटील यांच्यासोबतचे फोटोही समोर आणले आहेत.
रोहिणी खडसे म्हणाल्या, हे आरोप मी करण्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलंय की, ते आरोपी एका विशिष्ट पक्षाचे आहेत. त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एकनाथ शिंदेंसोबत आरोपींचे फोटो आहेत.
मला देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करायचे आहेत की, आरोपी जरी सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असले तरी त्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. पण, पीडित मुलीला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना घडवू नये, यासाठी देखील फडणवीसांनी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना करणे अपेक्षित आहे.
स्वारगेट घटनेतील आरोपीचेही फोटो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आमदारासोबतही समोर आले आहेत. जर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे कार्यकर्ते अशा छळाच्या प्रकरणांमध्ये सहभागी असतील तर देवेंद्र फडणवीसांनी जी कारवाई केली, त्याचं स्वागत आहे. पण, कडक कारवाई करणं अपेक्षित आहे, असं रोहिणी खडसे म्हणाल्या.
अन्यथा आरोपींची हिंमत वाढेल…
कदाचित ते सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आहेत, असं त्यांना उघडपणे मान्य करायचं नसेल. पण, त्यांनी इतके तरी मान्य केले की, ते विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, यासाठी फडणवीस यांचे कौतुकच करायला हवं, यांच्यावर कारवाई झाली नाही तर त्यांची हिंमत वाढत जाईल. ते सत्ताधारी पक्षाचे असल्याने त्यांना पाठबळ मिळता कामा नये, असं रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.