मुंबई – देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फटावरून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांकडून सडकून टीका करण्यात येत आहे. या प्रकरणात आता आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की त्या दिवशी काय घडलं होतं. ते फक्त दोनच नेते सांगू शकतात. अजित पवार आणि शरद पवारच (Sharad Pawar) याबाबत सांगू शकतात. मात्र, फडणवीस हे सध्या जे वक्तव्य करत आहेत. ती अत्यंत दुटप्पी भूमिका आहे, असा आरोप पवार यांनी केला.
राज्यातील शपथविधीच्या मुद्द्यावर रोहित पवार यांनी नगरमध्ये (Ahmednagar) माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले, की फडणवीस साहेब हे मोठे नेते आहेत. मी त्यांच्या अनुभवाचा आदर करतो. मात्र ते म्हणाले होते काही झालं तरी आम्ही राष्ट्रवादीसोबत (NCP) चर्चा करणार नाही, राष्ट्रवादीसोबत जाणार नाही. निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादीसोबत जाणार असं म्हटले या वक्त्यामध्ये कुठेतरी गल्लत आहे.
शिवसेना (Shivsena) फुटली तेव्हा ते म्हणाले ते शिवसेना फोडण्यामध्ये आमचा कुठलाही सहभाग नाही. मात्र विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शिवसेना फोडण्यामागचे कलाकार कोण होते. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी हसतच प्रतिक्रिया दिली, अशी दुटप्पी भूमिका एवढ्या मोठ्या नेत्याची येते याच मला आश्चर्य वाटतं.
काय म्हणाले होते फडणवीस ?
फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. सकाळच्या शपथविधीविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांशी चर्चा झाली होती. त्यांच्याशी चर्चा करूनच शपथविधी झाला होता, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. तसेच अजित पवार जर बोलले तर मी पुढे बोलेन असेही फडणवीस म्हणाले आहेत.