Ayodhya Ram Temple : अयोध्येत प्रभू श्रीराम (Ayodhya Ram Temple) यांचे भव्यदिव्य मंदिराच्या उभारणीचे काम सुरु आहे. मंदिराच्या सुशोभीकरणासाठी कलाकारांकडून मोठी मेहनत देखील घेण्यात येत आहे. यातच या मंदिराच्या सुंदरेत भर घालण्याचे काम नगरच्या एका कलाकारांकडून केले जात आहे. नगरकरांसाठी अभिमानाची बाब म्हणजे जगविख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे (Pramod Kamble) यांची कलाकृती ही अयोध्येत बनत असलेल्या राम मंदिरामध्ये झळकणार आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर रामायणतील शिल्प चित्र दाखवण्यात येणार आहे, त्या प्रसंगाचे थ्रीडी मॉडेल तयार करण्याचे काम नगरचे प्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार प्रमोद कांबळे यांना मिळाले असून सध्या नगरमध्ये या मूर्तीचे काम अतिशय वेगाने सुरू आहे.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले व आपल्या अनोख्या व मनमोहक अशा कलाकृतींनी जगात नगर जिल्ह्याचे नाव पोहचविणारे प्रमोद कांबळे यांनी नगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कांबळे यांनी आजवर अनेक शिल्प साकारलेले आहे ज्याची दखल जागतिकपातळीवर घेण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा कांबळे यांचे एक आगळेवेगळे शिल्प लवकरच अयोध्येत साकारणार आहे.
Ahmednagar News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच भुईकोट किल्ल्यात देशविरोधी वादग्रस्त घोषणाबाजी !
गेल्या अनेक वर्षांपासून बहुचर्चित असलेले व करोडो भक्त डोळे लावून बसलेले अयोध्येमधील प्रभू श्रीरामांचे मंदिरांच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. लवकरचं हे काम पूर्ण होऊन हे मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले देखील केले जाणार आहे. या मंदिराच्या उभारणीचे काम सुरु असून यामधील सुशोभीकरणापासून तर मंदिरातील कलाकृतीचे काम सुरु आहे. या कामाचे वेगवेगळे टप्पे करण्यात आले आहेत.
मंदिरामध्ये साकारण्यात येत असलेल्या शिल्पकृतींसाठी स्वतंत्र समिती आहे. यामध्ये दिग्गज शिल्पकार आणि वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी कार्यरत आहे. मंदिरामध्ये काही शिल्पकृती उभारल्या जाणार असून त्या प्रदक्षिणा मार्गावर उभारण्यात येत आहेत. विशेष म्हणजे दगडापासून तयार करण्यात येणाऱ्या या शिल्पाच्या माध्यमातून रामायणातील महत्त्वाचे प्रसंग दाखवण्यात येणार आहे. यामध्ये नगरकरांसाठी अभिमानाची बाब ठरणार ती म्हणजे हे शिल्प साकारण्यामध्ये नगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा देखील हातभार असणार आहे.
या शिल्पांसाठीचे चित्र प्रमोद कांबळे यांनी रेखाटले असून शिल्पाचे थ्रीडी मॉडेलही त्यांनी घडवण्यास सुरुवात केली आहे. मातीची थ्रीडी शिल्प सध्या प्रमोद कांबळे घडवत असून ती झाली की, जयपूर व राजस्थानला पाठवण्यात येणार आहे. मातीच्या शिल्पाप्रमाणे तिथे दगडांची शिल्पे बनविण्यात येणार आहेत. “हे काम करण्याची मला संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो, असे प्रमोद कांबळे म्हणाले आहे.