Download App

शनिशिंगणापूर बोगस कर्मचारी भरती घोटाळा; सुनावणीला मुहूर्त मिळाला

shani shingnapur: विश्वस्त मंडळाच्या कारभारावर मुंबई धर्मादाय आयुक्तांनी तीव्र शब्दांत टीका करत विश्वस्तांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती.

  • Written By: Last Updated:

shani shingnapur bogus employee recruitment scam hearing will be conducted on first of august:
अहिल्यानगरमधील शनिशिंगणापूरच्या (shani shingnapur) शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळावर मुंबई धर्मादाय कार्यालयाकडून चौकशीचा फेरा सुरू आहे. या विश्वस्त मंडळावर पाचशे कोटी रुपयांसह बोगस कर्मचारी भरती घोटाळा आणि बनावट ॲपद्वारे शनिभक्तांच्या फसवणूकीचे आरोप आहेत. याप्रकरणी विश्वस्त मंडळाच्या कारभारावर मुंबई धर्मादाय आयुक्तांनी तीव्र शब्दांत टीका करत विश्वस्तांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. विश्वस्तांच्या वतीने वकिलांनी याबाबत शुक्रवारी आपले म्हणणे धर्मादाय आयुक्तांना सादर केले. यावर आता 1 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.


मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

शनिशिंगणापूर इथे शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळाने देवाच्या नावावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका अहवालानुसार देवस्थानच्या कारभारात 2447 बोगस कर्मचारी दाखवून कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजला होता. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. (shani shingnapur bogus employee recruitment scam hearing will be conducted on first of august)

मुंबई धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून नोटीस

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार देवस्थानावर झालेल्या विविध आरोपांवर बाजू मांडण्यासाठी शनिशिंगणापूर देवस्थानला मुंबई धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नोटीस बजावून आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. यासाठी धर्मादाय आयुक्तांनी विश्वस्त मंडळाला नोटीस बजावत मुंबई कार्यालयात हजर राहून आपले म्हणणे मांडण्यासाठी सांगितले होते. नोटीसमध्ये 18 जुलै रोजी स्वतः किंवा प्रतिनिधीने समक्ष हजर राहून म्हणणे मांडण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.

1 ऑगस्ट रोजी सुनावणी

यानुसार शनिशिंगणापूर देवस्थानाने आपल्या वकिलांमार्फत 18 जुलै रोजी मुंबई धर्मादाय आयुक्तांसमोर आपले म्हणणे मांडले. यांवेळी आयुक्तांसमोर म्हणणे मांडण्यासाठी मुंबई येथील ॲडव्होकेट समीर जाधव, लक्ष्मण घावटे आणि सतीश पालवे यांना पाठवण्यात आले होते. त्यांनी त्यावेळी म्हणणे मांडण्यासाठी देवस्थानला आणखी वेळ हवा असल्याचे सांगितले. त्यानुसार आयुक्तांकडून देवस्थानाला म्हणणे मांडण्यासाठी 25 जुलै ही तारीख देण्यात आली होती. काल 25 जुलै रोजी देवस्थानच्या वकिलांनी विश्वस्त मंडळाच्या वतीने बाजू मांडली. त्यावर आता 1 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असल्याचे सांगितले आहे.

follow us