Download App

“नगरच्या पाणीयोजनांत गैरव्यवहार”, प्रशासनाला चॅलेंज देणारे लंके लोकसभेत बरसले

जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणी योजनांवर ३ हजार २०० कोटी रूपये खर्च केले जात आहेत. या योजना अतिशय निकृष्ट दर्जाच्या आहेत.

Nilesh Lanke News : नगर लोकसभा मतदारसंघात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ८३० पाणीयोजना मंजूर झाल्या असून या पाणीयोजनांच्या कामांमध्ये मोठा गैरव्यवहार झाला असल्याने या कामांची केंद्रीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी मंगळवारी लोकसभेत केली. सभागृहात पाणीयोजनांमधील गैरप्रकाराकडे सभागृहाचे लक्ष वेधताना खा. लंके म्हणाले, केंद्र शासनाने हर घर नल, और हर घर जल अशी घोषणा देत अतिशय महत्वपूर्ण जलजीवन मिशन ही योजना राबविली आहे. या योजनेसंदर्भात माझ्या मतदारसंघाचा जर विचार केला तर त्यात ८३० योजना मंजूर झाल्या आहेत.

त्यासाठी १ हजार ३३८ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनांच्या कामांवर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देखरेख केली जाते. जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणी योजनांवर ३ हजार २०० कोटी रूपये खर्च केले जात आहेत. या योजना अतिशय निकृष्ट दर्जाच्या झालेल्या असून केंद्रीय समितीमार्फत या योजनांच्या कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी खासदार लंके यांनी केली.

Nilesh Lanke ॲक्शन मोडमध्ये, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना घेरणार, ‘या’ दिवशी जनआक्रोश मोर्चा काढणार

लोकसभेत गेल्यानंतर खासदार नीलेश लंके हे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणी योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराकडे सातत्याने लक्ष वेधत आहेत. जिल्हा विकास संनियंत्रण समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीतही खा. लंके यांनी आक्रमक भूमिका घेत या भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले होते. माझ्यासोबत चला मी तुम्हाला या पाणी योजनांमधील भ्रष्टाचार दाखवितो भ्रष्टाचार नसेल तर मी राजीनामा देतो अशी आक्रमक भूमिका घेत खा. लंके यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आव्हान दिले होते. या पार्श्वभुमीवर खा. लंके यांनी संसदेमध्ये पुन्हा या प्रश्नावर सभागृहाचे लक्ष वेधले आहे.

 

follow us