Ahmednagar News : विधानसभा निवडणुकीपूर्वीच नगर शहरातून शिवसेनेच्या शिंदे गटाला (shivsena) धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे माजी नगर शहरप्रमुख दिलीप सातपुते (Dilip Satpute) यांना पदावरून पायउतार करण्यात आले होते. त्यांच्या जागी सचिन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता या निर्णयावरून सातपुते यांनी देखील विधानसभेपूर्वी वेगळा निर्णय घेण्याच्या दिशेने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासोबत सातपुते यांनी बैठकी घेत त्यांचे विचार जाणून घेत आहेत. दरम्यान, येणाऱ्या तीन ते चार दिवसात ते आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती समजतंय. आमदारकीच्या तयारीत असलेले सातपुते पक्षातून बाहेर पडणार का? व पुन्हा एकदा ठाकरे गटाकडे मध्ये प्रवेश करणार का? याबाबत तर्क-वितर्क आखले जात आहेत.
संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य; आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री आणि…
राज्यात लोकसभा निवडणुका पार पडल्या मात्र यामध्ये अत्यंत प्रतिष्टेच्या बनलेल्या नगर दक्षिणेमध्ये महायुतीचे उमेदवार असलेले सुजय विखे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे आता विधानसभेसाठी महायुतीमधील घटक पक्षांकडून देखील आता जपून पावले उचलली जात आहे. यातच येणाऱ्या विधानसभेमध्ये अहमदनगर शहरात पक्षाची पकड चांगली असावी, त्या अनुषंगाने सातपुते यांच्या जागी सचिन जाधव यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. महायुतीमध्ये असलेले सातपुते यांनी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांची भेट घेतली होती. यावरून देखील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली.
अहमदनगर सेंट्रल रोटरी क्लबच्या पहिल्या ग्लोबल ग्रँटचा लोकार्पण सोहळा उत्साहात
कारवाईला लोकसभेची किनार…
नगर शहर प्रमुखाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दिलीप सातपुते यांनी गेल्या दोन वर्षात कोणत्याही प्रकारची शाखा स्थापन केलेली नाही. तसेच पक्षाला अपेक्षित असे काम त्यांच्याकडून झाले नाही, म्हणून त्यांना या पदावरून दूर केले आहे. दरम्यान येणाऱ्या विधानसभेपूर्वीच स्थानिक पातळीवरचे राजकारण लक्षात घेता नगर शहरातील शिवसेनेत मोठा बदल झाला आहे. सातपुते यांना पक्षातील अंतर्गत कारण दिले असले तरी त्यांच्या हकालपट्टीला किंवा पदावरून दूर जाण्याला लोकसभेचीच निवडणुकीचे कारण असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
सातपुतेंसमोर पर्याय काय?
शिवसेनेमध्ये फुटू पडल्यानंतर दिलीप सातपुते यांनी ठाकरे यांना डावलत शिंदे गटाची वाट धरली होती. दरम्यान, सातपुते हे आमदारकीच्या तयारीत देखील असल्याचे बोलले जात आहे. मात्र शिंदे गटाकडून तिकीट मिळण्याची शक्यता धूसर असल्याचे दिसते आहे. यातच पक्षाकडून झालेली कारवाई पाहता व महाविकास आघाडीमधील नेत्यांसह पदाधिकाऱ्यांशी असलेला संपर्क पाहता सातपुते पुन्हा एकदा ठाकरे गटामध्ये प्रवेश करू शकतात. तसेच वेळ पडल्यास सातपुते हे अपक्ष देखील उमेदवारी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान येणाऱ्या काळात ते काही भूमिका घेणार? याकडे नगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.