Sharad Pawar : राजकारणात चढ-उतार येत असतात. हा जळगाव जिल्हा कायम काँग्रेसच्या विचारांचा राहिलेला आहे. 1956-57 साली संयुक्त महाराष्ट्रासाठी मोठा संघर्ष झाला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे राज्य आल्यानंतर येथे मोठे बदल झाले आहेत हे नक्की. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर अनेक जिल्ह्यात आज महाविकास आघाडीला वातावरण चांगलं आहे. तसंच, या जिल्ह्यातही आहे. पक्षामध्ये अनेक दिवसांपासून काम केल्यानंतर निवडणूक लढवण्याची इच्छा असते. मात्र, ती आम्ही दूर करू अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. ते जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
यातना सहन कराव्या लागत आहेत
यावेळी शरद पवारांना एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार असल्याबद्दल विचारलं असता, शरद पवार पवारांनी मोठा दावा केला आहे. पवार म्हणाले, सध्याच्या राजकीय वातावरणात मोठ्या प्रमाणात व्यक्तिगत पातळीवर आरोप, टीका केली जात आहे. अशी टीका किंवा आरोप या अगोदर महाराष्ट्रात कधी होत नव्हते. पंरतु, ते आता होत आहेत. त्यामुळे अनेकांना अशा घटनांमध्ये यातना सहन कराव्या लागत आहेत. कदातिच हीच अवस्था एकनाथ खडसेंची झाली असावी. त्यामुळे नाईलाजाने त्यांना भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घ्यावा लागला असेल असा गंभीर दावा शरद पवार यांनी केला आहे.
भाजपात प्रवेश करणार असल्याचं खडसेंच स्पष्टीकरण
एकनाथ खडसे यांनी दोन वर्षांपूर्वी भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली होती. तसंच, ते विधान परिषदेतील गटनेतेही होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे भाजपात जाणार असल्याच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यावर खडसे बोलले नसल्याने त्याबद्दल साशंकता होती. परंतु, नुकतंच, एकनाथ खडसे यांनी स्वत: आपण लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं आहे.
महाजन अडचणीत येऊ शकतात
विरोधकांचा या निवडणुकीत सुपडा साप होईल अशी टीका गिरीश महाजन यांनी केली याबद्दल पत्रकारांनी पवारांना प्रश्न विचारला असता, पवार म्हणाले गिरीश महाजन काय बोलले आणि काय करतात याबद्दल मला बोलायचं नाही. जर मी याबद्दल खोलात जाऊन बोललो तर त्यांना फार अडचणीचं होईल अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली. यानंतर पवार महाजनांबद्दल असं काय बोलणार असतील ज्याने महाजन अडचणीत येऊ शकतात अशी चर्चा रंगली असून राजकीय वर्तुळात त्याबद्दल तर्क-वितर्क लावले जात आहेत.