IAS Pooja Khedkar : परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि (IAS Pooja Khedkar) त्यांच्या कुंटुबियांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाही. आता या प्रकरणात आयकर विभागाची एन्ट्री झाली आहे. खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी मिळवलेल्या नॉन क्रिमिलेयर दाखल्याची चौकशी करून तसा अहवाल मागवण्यात आला आहे. यासाठी आयकर विभागाने खेडकर कुटुंबियांच्या उत्पन्नाची आणि त्यांच्या आई वडिलांनी भरलेल्या टॅक्सची माहिती मागवण्यात आली आहे. नगर जिल्हा प्रशासनानेही ही माहिती गोळा करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे.
Pooja Khedkar : “माझ्या मुलीला विनाकारण..” पूजा खेडकरच्या वडिलांचा दावा नेमका काय?
पूजा खेडकर प्रकरणात केंद्र सरकारच्या कार्मिक विभागानेही चौकशी सुरू केली आहे. या चौकशीसाठी आवश्यक असलेली माहिती स्थानिक प्रशासनाकडून मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे स्थानिक जिल्हा प्रशासनाकडूनही या प्रकरणात चौकशी सुरू करण्यात आली आहे. पूजा खेडकरांच्या आई वडिलांच्या उत्पन्नाचीही चौकशी केली जात आहे. पूजा खेडकर यांच्या नावावर कोट्यावधींची संपत्ती आहे. या संपत्तीतून त्यांना उत्पन्नही मिळते. आयकर विभागाकडे (Income Tax) दाखल करण्यात आलेल्या आयटीआरमधून या माहितीचा खुलासा झाला आहे.
पूजा खेडकर यांची वाशिमच्या महिला पोलीस टीमकडून चौकशी करण्यात आली आहे. रात्री उशिरा तब्बल तीन तास त्यांची चौकशी करण्यात आली असल्याची माहिती आहे. वाशिम पोलिसांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यांच्याकडून परवानगी घेतली होती. त्यानंतर पूजा खेडकर यांची रात्री उशिरा चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर वाशिम पोलिसांची टीम माध्यमांशी न बोलता निघून गेली. त्यामुळे ही चौकशी नेमकी कशासंदर्भात होती हे समजू शकलेलं नाही.
पूजा खेडकर प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र राज्यातील अनेक हॉस्पिटलमधून घेतलं आहे. नगरच्या जिल्हा रुग्णालयातून त्यांनी दृष्टीदोष आणि मानसिक आजारपणाबाबत प्रमाणपत्र घेतलं आहे. याशिवाय, त्यांनी पिंपरी चिंचवडमधील हॉस्पिटलमधून एक अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेतलं आहे. त्यामुळे त्या संशयाच्या फेऱ्यात अडकल्या आहेत.