मुंबई : राज्यभर गाजलेल्या 30-30 घोटाळ्याप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या घोटाळ्याची माहिती ईडीने मागवली आहे. याच दरम्यान, दानवे यांचे नाव मुख्य आरोपीच्या डायरीत सापडल्याची माहिती आहे.
राज्यभर गाजलेल्या तीस- तीस घोटाळ्यात संतोष राठोड मुख्य आरोपी आहे. या घोटाळ्याशी संबंधित तीन डायऱ्या पोलिसांना सापडल्यात. या डायऱ्यांमध्ये पैसे गुंतवणूक करणाऱ्यांची नावे आहेत. यातील एका डायरीतील यादीत अंबादास दानवे यांचे देखील नाव असल्याची माहिती समोर आली आहे.
या घोटाळ्याची चौकशी करत असलेल्या पोलिस पथकाच्या हाती लागलेल्या डायरीत जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे आमदार, त्यांचे नातेवाईक, पोलिस अधिकारी, शिक्षक, उद्योजकांसह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत.
तीस-तीस घोटाळयाची कागदपत्रे ईडीने औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकड़ून नेली आहेत. यामुळे या घोटाळ्याची ईडीने चौकशी केली तर आ. दानवे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचा आणखी एक नेता ईडीच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.
नेमकं प्रकरण काय?
30-30 योजनेच्या नावाखाली भोळ्या-भाबड्या शेतकऱ्यांना गुंतवणुकीवर 30 टक्के परतावा देतो, असे अमिष दाखवण्यात आले होते. त्यानंतर या योजनेची व्याप्ती वाढत गेल्यानंतर आरोपी संतोष राठोड आणि त्याच्या एजंटांनी अचानक हात वर केले. हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा आहे.
दरम्यान या प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असतांना आरोपी राठोडकडून मिळालेल्या डायरीत अनेक धक्कादायक नावे समोर आली आहेत. या प्रकरणाची ईडीकडून देखील चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले जाते.