बारामती पोटनिवडणूक, सुनेत्रा पवार बिनविरोध की लक्ष्मण हाके फिरवणार भाकरी? नवीन अहवाल समोर
Baramati by-Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.
Baramati by-Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही मतदारसंघात 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार कोण? याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील पोटनिवडणुकीत उतरण्याचे संकेत दिल्याने सुनेत्रा पवारांसाठी ही निवडणूक सोपी जाणार का? याबाबत राजकीय वर्तुळात जोराने चर्चा सुरु होताना दिसत आहे. तर दुसरीकडे या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘रुद्र रिसर्च अँड एनालिटिक्स’ या संस्थेने थेट ग्राउंडवर जाऊन निवडणुकीचा आढावा घेतला आहे.
सहानुभूतीची लाट की राजकीय सहमती?
‘रुद्र रिसर्च अँड एनालिटिक्स’ या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बारामती विधानसभा मतदारसंघात संपूर्ण बारामती तालुक्यासह 7 जिल्हा परिषद गट, बारामती आणि मालेगाव बु. या 2 नगरपालिकांचा समावेश होतो. तसेच एकूण 161 गावे आणि 386 बूथचा या मतदारसंघात समावेश होतो. बारामती मतदारसंघामध्ये एकूण 3 लाख 83 हजार 767 मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 93 हजार 496 तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 90 हजार 271 इतकी आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघासाठी (Baramati by-Election) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उमेदवार असणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे बारामती मतदारसंघात असलेले कार्य, जनसंपर्क, त्यांना मानणारा मतदार, कामाबद्दल असलेली तत्परता आणि स्पष्टोक्तेपणा यामुळे नागरिकांमध्ये ते लोकप्रिय होते. त्यांच्या निधनानंतर मतदारांमध्ये प्रचंड सहानुभूती निर्माण झाल्याचे दिसून येते. यामुळे आगामी पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांची विधानसभा सदस्य म्हणून बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. पण ओबीसी नेते लक्ष्मण हाके(Laxman Hake) यांनी ओबीसींचे (OBC) प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक हे माध्यम असून बारामती मतदारसंघाची निवडणूक लढवायची की नाही हे कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून ठरवणार असल्याचे सांगितले. यामुळे निवडणूक बिनविरोध होईल का नाही याबद्दल संभ्रम दिसून येतो.
तर दुसरीकडे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती’ सलग्नीत असलेल्या रुग्णालयाचे नाव बदलून स्व. अजित पवार यांचे नाव देण्याची झालेली प्रक्रीया यामुळे बारामती मतदारसंघामध्ये महत्त्वाचा फॅक्टर असलेला धनगर समाज नाराज दिसून येत आहे. बारामती मतदारसंघात अंदाजे 28% धनगर मतदार असून या समाजाचा निवडणुकीवर मोठा प्रभाव असल्याचे दिसून येते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवार ?
बारामती मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने व पक्षाकडून विरोधात उमेदवार देण्यात येणार नसल्याची बाब आणि अजित पवार यांच्याबद्दल मतदारांमध्ये निर्माण झालेल्या सहानुभूतीमुळे सुनेत्रा पवार यांचा आगामी निवडणुकीत विजय होण्याची अधिक शक्यता असल्याचे ग्राउंडवर मतदारांसोबत केलेल्या संवादातून दिसून येत असल्याची माहिती ‘रुद्र रिसर्च अँड एनालिटिक्स’ या संस्थेने दिली आहे.
1 एप्रिलपासून ATM संबंधित नियम बदलणार; तुमच्यावर काय होणार परिणाम? जाणून घ्या सर्वकाही –
बारामती विधानसभा निवडणूक बिनविरोध होणार की नाही ही बाब आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे. मात्र, निवडणूक झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा एकतर्फी होण्याची शक्यता अधिक दिसून येते.
