Download App

पंकजा मुंडे यांना भाजपनं काढून तरी टाकावं….

  • Written By: Last Updated:

मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या नावापुरत्याच भाजपच्या नेत्या राहिल्या आहेत का? त्यांच्यापेक्षा कमी क्षमता असलेले महाराष्ट्रातील नेते आमदार-खासदार होत असताना पंकजा यांनाच पक्ष दूर का ठेवत आहे, असा प्रश्न त्यांच्याही मनात येत असेल. म्हणायला त्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. पण प्रत्यक्षात त्यांना गेली पाच वर्षे साईडलाईन केल्याचे दिसून आले आहे.

Rajya Sabha : “थोडं थांबा, माझ्या निर्णयाचं गणित तुम्हालाही कळेल”; पटेलांचं सूचक वक्तव्य

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून तीन जागांसाठी पक्षाने तीन नवीन खासदार केले. भाजपमध्ये येऊन 24 तास पूर्ण होण्याच्या आतच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे खासदार झाले. पक्षाशी एकनिष्ठ म्हणून अजित गोपछडे हे खासदार झाले. याच गोपछडे यांचे विधान परिषदेचे तिकीट जाहीर करून ऐनवेळी रद्द केले होते. बाबरी मशिदीच्या घुमटावर चढून तो पाडण्याच्या कामगिरीचे बक्षीस त्यांना मिळाले. तिसऱ्या नशिबवान नेत्या ठऱल्या त्या मेधा कुलकर्णी. कोथरूडची हक्काची जागा त्यांना चंद्रकांत पाटलांसाठी 2019 मध्ये सोडावी लागली. त्यानंतर त्या चार वर्षे आपली नाराजी व्यवस्थितपणे मांडत होत्या. ब्राह्मण समाजाला न्याय द्यायचा म्हणून त्यांनाही खासदारकीची संधी मिळाली. पण भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे, असे म्हणणाऱ्या पंकजा यांना पुन्हा पक्षाने प्रतिक्षा करायला लागली.

Narayan Rane vs Ashok Chavan : 16 वर्षे झाली… अशोकाचं ‘झाड’ राणेंचा पिच्छा सोडेना…

पंकजांवर राजकीय वनवासाची वेळ का आली?

पंकजा यांच्यावर अशा राजकीय विजनवासाची वेळ का आली, याचाच शोध या निमित्ताने घेऊया. विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने तिकिट नाकारले होते. आता हे दोघेही पक्ष संघटनेत महत्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. पंकजांना या निवडणुकीत परळीमधून तिकिट मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासाठी सभाही घेतली. पण 2019 च्या या निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजांचा पराभव झाला. तेथूनच त्यांच्या राजकीय घसरणीला सुरूवात झाली.

देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षांतर्गत विरोधक म्हणून पंकजा यांची 2014 ते 2019 दरम्यान प्रमुख ओळख झाली. याच वादातून मग त्यांच्याकडील खात्यांना काट लावण्याचे उद्योग झाले. कधीकाळी पंकजा यांचे समर्थक असलेले राम शिंदे यांच्यासारखे नेतेदेखील देवेंद्र फडणवीस यांच्या गोटात गेले. राम शिंदे यांचाही 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. पण ज्यांच्या सभांमुळे राम शिंदे यांची मते वाढायला मदत होते, त्या पंकजा मात्र पदाविना राहिल्या.

नरेंद्र मोदी, अमित शाह पंकजांच्या पाठीशी पण तरीही…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी पंकजा यांचे वेगळे नाते आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजांचे पाठीशी हे दोन्ही नेते असल्याचे चित्र होते. पण परळीतील पराभवातून पंकजा या आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवून देण्यासाठी धडपडू लागल्या. दसरा मेळाव्यातून त्या मिक्स सिग्नल देत राहिल्या. आपण पक्षामुळे नाही तर, पक्ष आपल्यामुळे आहे, असे त्या आडवळणाने सांगू लागल्या. आपण मुंबईत कार्लालय उघडणार, कार्यकर्त्यांना भेटणार, मी कार्यकर्त्यांची आई आहे, अशी भाषा त्या वापरू लागल्या. त्यांच्या काही वक्तव्यातून त्या पक्ष सोडणार असल्याचाही अर्थ घेण्यात आला.

पंकजा यांचा हा अहंकार भाजपच्या नेत्यांना पसंत पडणे शक्य नव्हते. त्यात फडणवीस यांचे विरोधक एकनाथ खडसे हे पंकजांच्या व्यासपीठावर आले. त्याचाही फटका पंकजांना बसला. तेथूनच पंकजा आणि भाजप यांच्यात दरी पडू लागली. मध्य प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून त्यांना संघटनेत राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्यात आली. मध्य प्रदेशाच्या चार महिन्यांपूर्वी निवडणुका झाल्या. या निवडणुकांत पंकजा यांनी प्रभारी म्हणून खरचं काही भूमिका बजावली का? याचेही उत्तर पक्षश्रेष्ठींना नकारार्थीच मिळाले.

भाजपप्रणित महायुतीत राष्ट्रवादी काॅंग्रेसचा समावेश झाल्यानंतर पंकजा यांचे महत्व तर आणखी कमी झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे आता बीड जिल्ह्याचे कारभारी झाले आहेत. ते पंकजा यांची ताकद आणखी क्षीण करण्याचा प्रयत्न करणार, हे स्वाभाविक आहे. भावनिकदृष्ट्या हे दोघे भाऊ-बहीण एकत्र आल्याचे सध्याचे चित्र आहे. पण राजकारणात नात्यांना स्थान नसते. धनंजय हे कठोर राजकारण्याप्रमाणे पंकजा यांचा बीडमधील प्रभाव कमी करणार आहेतच. पंकजा यांच्या भगिनी प्रीतम मुंडे या भाजपच्या बीडमधील खासदार आहेत. प्रीतम यांना पुन्हा  निवडून येण्यासाठी धनंजय यांच्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.

या साऱ्या बाबी असल्या तरी पंकजा यांचा पक्षाला काहीच उपयोग नाही का? पक्षाविषयी जाहीर नाराजी व्यक्त करणाऱ्या मेधा कुलकर्णी खासदार होऊ शकतात. मग पंकजा यांना का समजावून घेतले जात नाही. फर्ड्या वक्त्या म्हणून पंकजांचा पक्षाला उपयोग झालाच आहे. निवडणुकीच्या काळात त्यांच्या सभा व्हाव्यात म्हणून पंकजांना मागणी असते. पण त्याच पंकजांना पदासाठी सतत डावलले जात आहे. वंजारी समाजाचे नेतृत्व पंकजांकडे आजही आहे. भागवत कराड, रमेश कराड अशा अनेक वंजारी समाजातील नेत्यांना भाजपने संधी दिली. तरीही पंकजांना ते पर्याय ठरू शकत नाही. राज्यातील संपूर्ण ओबीसी समाजात खदखद आहे. त्याचे नेतृत्व सध्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याकडे आपसूक आले आहे. भाजपकडून पंकजा यांना ही संधी होती. पण तेथेही त्यांना पक्षाने पुढे येऊ दिलेले नाही.

पंकजा यांची ही कोंडी कशासाठी सुरू आहे, याचा शोध त्या घेत आहेत. पंकजा यांची कोंडी अशी आहे की, त्यांना पक्षातूनच का काढत नाही, असा सवाल विचारला जात आहे. ही अतिशयोक्ती वाटेल. पण पंकजांनी भाजपमध्येच राहावे आणि प्रदीर्घ वाट पाहावी हेच सध्या तरी त्यांच्यापुढे मांडून ठेवलेले आहे. त्यांची ही कोंडी केव्हा फुटणार, याचे उत्तर लोकसभा निवडणुकीत मिळण्याची शक्यता आहे. बहीण प्रीतम यांच्याऐवजी पंकजा यांना बीडमधून उमेदवारी देण्याचा प्रस्ताव असल्याचे बोलले जात आहे. तो पर्याय प्रत्यक्षात आला तर ठीक आहे. पण नाहीच आला तर, प्रश्न कायम आहे. पंकजा यांना भाजपमधून का काढत नाही?

follow us