Parbhani Crime News : काळीज पिळवटून टाकणाऱ्या आणि माणुसकी संपत चाललेल्या घटना रोज आपल्याला ऐकायला मिळत आहेत. शैक्षणिक संस्थाचालकांकडून पालकांचा इतका छळ सुरु आहे की, त्यामध्ये माणसांचे जीव चाललेत. (Crime) विद्यार्थ्यांची टीसी मागितली तर उर्वरीत फी भरेपर्यंत टीसी दिली जात नाही. परभणीत एक वारकरी संप्रदायाचा पालक आपल्या मुलीची टीसी काढण्यासाठी शाळेत गेले यावेळी उर्वरित फीससाठी चक्क संस्थाचालकाने पालकाला एवढी मारहाण केली की, त्यात या पालकाचा मृत्यू झालाय.
तीन वर्षीय मुलीचा तगादा
परभणीच्या उखळद गावातील पल्लवी जगन्नाथ हेंडगे या विद्यार्थिनीचा प्रवेश अवघ्या काही दिवसांपूर्वी पूर्णा तालुक्यातील हट्टा येथे असलेल्या हायटेक निवासी शाळेत तिचे वडील जगन्नाथ हेंडगे यांनी तिसरीत केला होता. मात्र तिथे काही दिवस राहिल्यानंतर मला इथे नको म्हणत गावातील शाळेतच टाका असा तगादा तीन वर्षीय मुलीने पालकांकडे लावला होता. त्यावरून तिचे वडील जगन्नाथ हेंडगे हे आपल्या मुलीची टीसी काढण्यासाठी हायटेक शाळेत गेले असता तिथेच त्यांचा घात झाला.
संस्थाचालक असलेल्या प्रभाकर चव्हाण यांना हेंडगे यांनी प्रवेश घेताना दिलेले पैसे मागितले. यावेळी चव्हाण यांनीही हेंडगे यांना तुम्हीच उर्वरित फी द्या अशी मागणी केली .यातूनच वाद झाला अन् संस्थाचालक असलेल्या प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नीने जगन्नाथ हेंडगे यांना बेदम मारहाण केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, घटना घडताच काल रात्री जगन्नाथ हेंडगे यांना तत्काळ परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचे शवविच्छेदन करुन त्यांच्यावर उखळद गावात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
शरद पवारांना पुन्हा धक्का! परभणीतील माजी आमदार अजितदादांच्या गटात; आजच करणार प्रवेश
जीव घेणाऱ्या मुजोर संस्थाचालकावर कडक कारवाई करण्यात यावी आणि संस्थाही बंद करण्यात यावी अशी मागणी जगन्नाथ हेंडगे यांच्या कुटुंबियांनी केली आहे. तर जगन्नाथ हेंडगे यांना केवळ 3 एकर जमीन आहे. या शेती करण्याबरोबरच ते अतिशय मनमिळाऊ आणि वारकरी संप्रदायाचा झेंडा हाथी घेवून सर्वत्र कीर्तन प्रवचन करत होते. त्यामुळे त्यांना महाराजही बोलले जायचे. त्यांना 2 मुली आणि एक मुलगा आहे. जगन्नाथ हेंडगे यांचा केवळ फिससाठी अशा पद्धतीने जीव घेण्यात आला आहे. यातील दोषी संस्थाचालकाला सरकारने सोडू नये, कठोर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी ही केलीय.
दबाव येऊ नये
या प्रकरणात जगन्नाथ हेंडगे यांचे काका मुंजाजी हेंडगे यांच्या फिर्यादीवरुन पूर्णा पोलीस ठाण्यात हायटेक निवासी शाळेचे संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांची पत्नी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या प्रथमतः दोघेच आरोपी आहेत. परंतू, इतर काही जण यात समाविष्ट आहेत का? याचा तपास पोलीस करणार आहेत. दरम्यान, हायटेक निवासी शाळेचा संस्थाचालक हा राजकीय व्यक्ती असल्यामुळे या प्रकरणांमध्ये राजकीय दबाव येऊन पोलीस कारवाईत दिरंगाई न होता केवळ फी साठीच पालकाचा जीव घेणाऱ्या या संस्थाचालकवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.