‘आपला मावळा’ संघटनेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या राजगड दुर्गसंवर्धन मोहिमेत हजार स्वयंसेवकांचा सहभाग

किल्ले राजगडावर खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली ‘आपला मावळा’ संघटनेच्या माध्यमातून दुर्गसंवर्धन व स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

Untitled Design   2026 08 31T123310.853

Untitled Design 2026 08 31T123310.853

Rajgad Fort conservation campaign : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या किल्ले राजगडावर खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली ‘आपला मावळा’ संघटनेच्या माध्यमातून रविवारी दुर्गसंवर्धन व स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ‘आपला मावळा’ संघटनेची ही 17 वी दुर्गसंवर्धन मोहीम होती. या मोहिमेत तब्बल हजार स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. भल्या पहाटेच खासदार निलेश लंके आणि मावळे राजगडाच्या पायथ्याशी दाखल झाले. मोहिमेदरम्यान गडावरील कचरा संकलन, स्वच्छता, डागडुजी, दगड-दुरुस्ती, नामफलक लावणे यासह दुर्गसंवर्धनाचे विविध उपक्रम राबवण्यात आले. स्वयंसेवकांनी श्रमदान करत गडाचा परिसर स्वच्छ केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात राजगडाला विशेष स्थान आहे. तब्बल 26 वर्षे राजगड हा मराठा साम्राज्याची राजधानी होता. महाराजांच्या कारकिर्दीतील अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा हा किल्ला साक्षीदार राहिला आहे. त्यामुळे राजगड हा केवळ ऐतिहासिक वास्तू नसून स्वराज्याच्या इतिहासाचा महत्त्वाचा ठेवा असल्याचे निलेश लंके यांनी सांगितले. मात्र, एवढे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या राजगडावर पर्यटक आणि शिवप्रेमींसाठी आवश्यक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याबद्दल लंके यांनी नाराजी व्यक्त केली.

‘12 तारखेपूर्वी मुंबईत पोहोचा, आझाद मैदानावर मात्र जाऊ नका’; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

राजगडावर जाण्यासाठी पुरेसा व सुस्थितीत रस्ता नाही, महिलांसाठी आवश्यक शौचालयांची सुविधा उपलब्ध नाही, तसेच अन्य मूलभूत सुविधाही अपुऱ्या असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.‘गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याबरोबरच या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक सुविधा मिळणेही गरजेचे आहे,’ अशी भूमिका लंके यांनी मांडली. राजगडाच्या विकासासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

‘आपला मावळा’च्या माध्यमातून यापूर्वीही महाराष्ट्रातील विविध गड-किल्ल्यांवर दुर्गसंवर्धन, स्वच्छता आणि जतनाच्या मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. राजगडावरील 17 व्या मोहिमेत हजार स्वयंसेवकांनी सहभाग घेत इतिहासाचा हा वारसा जपण्यासाठी श्रमदान केले.

Exit mobile version