‘हिरो कोण विचारलं तर एकानं खान, दुसऱ्यानं पुष्पा सांगितलं’; समीर वानखेडेंचं नव्या पिढीवर भाष्य
विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी आपण कधीही सोडत नसल्याचे सांगत वानखेडे यांनी तरुणांना भविष्यातील करिअरबाबतही मार्गदर्शन केले.
Sameer Wankhede’s comments on the new generation : शाळेतील मुलांना ‘खान’ आणि ‘पुष्पा’मधील पात्र हिरो वाटतात, मात्र तानाजी मालुसरे आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची नावंही अनेकांनी ऐकलेली नाहीत, अशी खंत माजी NCB अधिकारी आणि IRS अधिकारी समीर वानखेडे यांनी व्यक्त केली. मनसेकडून आयोजित युवा गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना वानखेडे यांनी नव्या पिढीचे आदर्श, स्पर्धा परीक्षा, सोशल मीडिया, अमली पदार्थांचे वाढते संकट आणि राष्ट्रसेवा अशा विविध विषयांवर भाष्य केले. या कार्यक्रमाला मनसे नेते अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलण्यास सुरुवात करताना समीर वानखेडे यांनी ‘वंदे मातरम्’ची घोषणा दिली. उपस्थित तरुणांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याचे जाणवल्यानंतर त्यांनी ‘वंदे मातरम्ला मला प्रतिसाद येत नाही’, असे म्हटले. त्यानंतर उपस्थित तरुणांनी मोठ्या आवाजात ‘वंदे मातरम्’ म्हणत त्यांना प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी आपण कधीही सोडत नसल्याचे सांगत वानखेडे यांनी तरुणांना भविष्यातील करिअरबाबतही मार्गदर्शन केले.
UPSC आणि MPSCसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल तर ती आतापासूनच सुरू करा, असा सल्ला वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना दिला. इन्स्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जास्त वेळ घालवण्याऐवजी सामान्य ज्ञान वाढवण्यावर भर द्यावा, दररोज अभ्यास करावा आणि नियमित वर्तमानपत्र वाचावे, असे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना प्रत्येकाने पर्यायी करिअरचा ‘बॅकअप प्लॅन’ही तयार ठेवावा, असेही त्यांनी नमूद केले. सैन्यात जाण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनीही त्यादृष्टीने योग्य तयारी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकला; लारक बेटावर US चा हल्ला, इराणकडून बॅलेस्टिक मिसाइलने प्रत्युत्तर
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे UPSCमधील प्रमाण कमी असल्याची खंतही वानखेडे यांनी व्यक्त केली. उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानसारख्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची UPSCमधील टक्केवारी कमी असल्याचे त्यांनी म्हटले. महाराष्ट्राचे प्रश्न प्रभावीपणे सोडवायचे असतील तर प्रशासनात अधिकाधिक मराठी अधिकारी आले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. आपण स्वतः मराठी असूनही आंध्र प्रदेश आणि चेन्नईसारख्या ठिकाणी काम केले असल्याचे उदाहरणही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी देशातील अमली पदार्थांच्या वाढत्या समस्येवरही वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना सावध केले. देशात ड्रग्सचा प्रश्न गंभीर असून MDसारखे घातक अमली पदार्थ तरुणांसाठी अत्यंत धोकादायक आहेत, असे ते म्हणाले. अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांकडून विशेषतः शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. गांजासह विविध अमली पदार्थांच्या सेवनामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात, असे सांगताना त्यांनी काही घटनांचाही उल्लेख केला. पार्टी ड्रग्सच्या सेवनामुळे व्यक्तीला अनेक तास स्वतःवर नियंत्रण राहत नाही आणि त्याचा शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा पदार्थांपासून पूर्णपणे दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
अमली पदार्थांचे सेवन हा केवळ आरोग्याशी संबंधित विषय नसून त्याला कायदेशीर आणि राष्ट्रीय सुरक्षेचाही पैलू असल्याचे वानखेडे म्हणाले. अमली पदार्थ बाळगणे किंवा त्यांचे सेवन केल्यास कायद्यानुसार कठोर शिक्षेची तरतूद असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना त्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. ड्रग्सच्या व्यवहारातून निर्माण होणारा पैसा दहशतवादी कारवायांपर्यंत पोहोचू शकतो आणि तोच पैसा देशाविरोधात वापरला जाऊ शकतो, असा दावाही त्यांनी केला.
विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीत एल्गार; 5 तारखेला मोठं आंदोलन करणार, अभिजीत दीपकेंची घोषणा
नव्या पिढीच्या आदर्शांबाबत बोलताना मात्र वानखेडे यांनी विशेष चिंता व्यक्त केली. आपली नवीन पिढी घडवताना आपण कुठेतरी चुकत आहोत, असे मला वाटते. मी एका छोट्या मुलाला त्याचा हिरो कोण आहे, असे विचारले असता त्याने एका ‘खान’चे नाव सांगितले. आणखी दोन-तीन मुलांना विचारले असता एकाने ‘पुष्पा’ असे उत्तर दिले, असे वानखेडे म्हणाले. या परिस्थितीबाबत शिक्षकांनीही आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
तानाजी मालुसरे आणि बाजीप्रभू देशपांडे यांची नावं तुम्ही कधी ऐकली आहेत का? असा प्रश्न उपस्थित विद्यार्थ्यांना विचारत वानखेडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता व्यक्त केली. मी त्या मुलांना सांगितले की हिरो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कुठेतरी आपण चुकतोय आणि काहीतरी हरवत चाललं आहे. आपलं आयुष्य घडवायचं असेल तर आपल्यासमोर असे आदर्श असायला हवेत. त्यांच्याबद्दल वाचा आणि त्यांचा इतिहास समजून घ्या, असे वानखेडे यांनी सांगितले.
शिवजयंती किंवा 15 ऑगस्टसारख्या विशेष दिवसांपुरत्या केवळ घोषणा देऊन थांबू नका, तर दररोज किमान दहा मिनिटे देशासाठी योगदान दिलेल्या महापुरुषांबद्दल वाचा, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. तरुणांनी स्वतःचे आयुष्य घडवतानाच राष्ट्रसेवेची भावना जपावी, असे आवाहन करत समीर वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना इतिहासातील कर्तृत्ववान व्यक्तींना आदर्श मानण्याचा संदेश दिला.