Pimpri-Chinchwad Municipal Corporation : पिंपरी-चिंचवड मधील भामा-आसखेड जलवाहिनीच्या कामांत विलंब आणि त्रुटीमुळे बडतर्फ करण्यात आलेल्या ठेकेदारालाच पुन्हा काम देण्याचा प्रयत्न सुरू असल्याने महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे गैरव्यवहार मान्य करून ठेकेदाराला हटविण्याची कारवाई, तर दुसरीकडे त्यालाच पुन्हा संधी देण्याची तयारी या परस्परविरोधी भूमिका दिसून येत आहेत.
महापौर रवी लांडगे (Ravi Landge) यांनी केलेल्या पाहणीत या प्रकल्पाचे सुमारे 70 टक्के काम पूर्ण झाल्याचे दिसून आले. मात्र तीन ते चार ठिकाणी काम पूर्णपणे ठप्प असल्याचे वास्तव समोर आले. स्थानिक ग्रामस्थ सहकार्य करण्यास तयार असतानाही काम रखडल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. या अपयशाची जबाबदारी निश्चित करून कडक कारवाई होणे अपेक्षित असताना, उलट त्याच ठेकेदाराला पुन्हा संधी देण्याचा विचार पुढे येत असल्याने पालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान, संबंधित ठेकेदार कंपनीच्या प्रमुखांची आयुक्तांसोबत बैठक झाली असून, या बैठकीला काही पक्षीय नेतेही उपस्थित असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा संशय बळावला आहे. महापौरांनी नवीन निविदा प्रक्रियेला लागणारा कालावधी आणि संभाव्य सात महिन्यांचा विलंब हे कारण पुढे केले असले, तरी प्रश्न असा की, विलंबाची शिक्षा नागरिकांनीच का भोगायची? चुकी करणाऱ्या ठेकेदारालाच पुन्हा संधी देणे म्हणजे गैरव्यवहारांना मूक संमती देण्यासारखे नाही का, अशी चर्चा शहरात रंगली आहे.
एअरलाईन्सची लूट ते ट्रॅफिक जाम; चड्ढांच्या प्रश्नांनी सरकार हादरलं अन् आता पद गेलं
भामा-आसखेडसारखा महत्त्वाचा प्रकल्प वेळेत आणि पारदर्शकपणे पूर्ण होणे अपेक्षित असताना, त्याच प्रकल्पाभोवती संशयाचे सावट गडद होत आहे. जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई होणार, की पुन्हा वेगळे राजकारण होणार याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
