Police claim that Gadchiroli is completely free of Naxals : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादाविरोधातील लढ्यात महाराष्ट्र पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत पोलिसांनी आठ जहाल नक्षल्यांना अटक केली असून, तब्बल 38 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या पाच नक्षल्यांनी आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. या कारवाईनंतर गडचिरोली जिल्हा पूर्णपणे नक्षलमुक्त झाल्याचा दावा पोलिस प्रशासनाने केला आहे.
अटक करण्यात आलेल्या नक्षल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 चा विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको, त्याची पत्नी आणि त्याच कंपनीतील सदस्य जन्नी उर्फ नगी येमला, तसेच जयराम गावडे, मुकेश अवलाम, विजय तामो, रजिता मडावी, ज्योती पोटावी आणि आमती पोडियाम यांचा समावेश आहे. या सर्वांवर मिळून तब्बल 64 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
पोलिसांनी या कारवाईदरम्यान नक्षल्यांकडून 65 लाख 34 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. याशिवाय एके-47, एसएलआरसह इतर अत्याधुनिक शस्त्रसाठाही हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नक्षलवादी संघटनांच्या आर्थिक आणि शस्त्रसज्ज जाळ्याला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे.
दरम्यान, 7 फेब्रुवारी 2026 रोजी भामरागड तालुक्यातील फोदेवाडा गावाजवळ झालेल्या चकमकीत एका जवानाला वीरमरण आलं होतं. त्या हल्ल्यात अटक करण्यात आलेल्या काही नक्षल्यांचा सहभाग असल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितलं की, अटकेतील चार नक्षल्यांना तेलंगणातून, तर दोन जणांना कुमनार आणि दोन जणांना नैताळा परिसरातून ताब्यात घेण्यात आलं.
इंधन काटकसरीच्या आवाहनानंतर सुप्रिया सुळेंचं मोठं पाऊल; सरकारी सुरक्षा आणि वाहने परत घेण्याची विनंती
आज आत्मसमर्पण करणाऱ्या पाच नक्षल्यांमध्ये एक विभागीय समिती सदस्य, एक प्लाटून समिती सदस्य, एक क्षेत्रीय समिती सदस्य आणि दोन दलम सदस्यांचा समावेश आहे. शासनाने त्यांच्यावर एकूण 38 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये मधु उर्फ राकेश वेळदा, जीवन उर्फ जग्गू मडकाम, रजनी उर्फ दुर्गा धुर्वा, मंगली कुरसाम आणि लक्ष्मी पुनेम यांचा समावेश आहे.
गडचिरोली पोलिसांच्या सातत्यपूर्ण मोहिमा, स्थानिक नागरिकांचे सहकार्य आणि केंद्र-राज्य सुरक्षा यंत्रणांच्या समन्वयामुळे हा मोठा टप्पा गाठता आल्याचं पोलिस प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र, “नक्षलवादाचा सशस्त्र संघर्ष संपला असला तरी विचारधारा पूर्णपणे संपली आहे असं म्हणता येणार नाही,” असं स्पष्ट करत पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी भविष्यात इतर राज्यांतून नक्षलवादी पुन्हा गडचिरोलीत शिरकाव करू नयेत, यासाठी पोलिस दल सतत सतर्क राहणार असल्याचं सांगितलं.
गेल्या अनेक दशकांपासून नक्षलवादामुळे अस्थिर राहिलेल्या गडचिरोली जिल्ह्यासाठी ही घटना ऐतिहासिक मानली जात असून, विकास आणि शांततेच्या दिशेने हा निर्णायक टप्पा असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
