Police officer’s disgusting demand to female accused : पालघरमध्ये सायबर फसवणुकीच्या मोठ्या प्रकरणाचा उलगडा करत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असली, तरी तपासादरम्यान उघडकीस आलेल्या एका संतापजनक प्रकारामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणेवर प्रशचिन्ह निर्माण झाले आहे. सायबर पोलिसांनी सुमारे 80 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणाचा छडा लावत पालघर येथून दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत एका महिला आरोपीचा देखील समावेश आहे.
प्राथमिक तपासात या टोळीने विविध ऑनलाईन माध्यमांतून नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. सायबर गुन्ह्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत ही कारवाई महत्वाची मानली जात आहे. मात्र, या प्रकरणाच्या तपासादरम्यान एक धक्कादायक आणि अत्यंत लज्जास्पद घटना समोर आली. अटकेतील महिला आरोपीशी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जाधव याने अयोग्य वर्तन करत तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव, मी तुला दहा हजार रुपये देतो, अशी अमानवी मागणी केल्याचा गंभीर आरोप झाला आहे.
विलीनीकरणबाबत चर्चा नाही कार्यकर्ते डिस्टर्ब होतात, तटकरेंच्या भूमिकेवर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया
याशिवाय, गुन्ह्यातून सुटका करून देण्याचे आमिष देखील दाखवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. हा प्रकार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने कारवाई करत राजेश जाधव यांचे निलंबन केले. पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या या कृत्याची गंभीर दखल घेत त्याच्या विरोधात स्वतंत्र फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, सायबर फसवणुकीच्या वंध्यतंय घटनांमुळे पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात असली, तरी तपास प्रक्रियेतच काही अधिकाऱ्यांकडून होणारे असे गैरवर्तन ही चिंतेची बाब ठरत आहे.
या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार असून, या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
