राहुरी पोटनिवडणुकीत राजकीय ट्विस्ट; रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील थेट प्राजक्त तनपुरेंच्या कार्यालयात

रवींद्र चव्हाण आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कर्डिलेंची भेट घेण्यापूर्वी प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात पोहोचले.

Untitled Design 51

Untitled Design 51

Political twist in Rahuri by-election : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विविध पक्षांच्या हालचालींना वेग आला असून, नेत्यांच्या भेटीगाठींमुळे चर्चांना अधिक उधाण आले आहे. आजच्या घडामोडींनी मात्र या निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण केला आहे. भाजपकडून उमेदवार म्हणून चर्चेत असलेले अक्षय कर्डीले आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर येत होती. त्यासाठी त्यांच्या प्रचाराची तयारी देखील जोरात सुरू होती. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे राहुरी येथे दाखल झाले होते. कर्डीले यांच्या प्रचाराला बळ देण्यासाठी त्यांच्या ही भेट महत्वाची मनाली जात होती.

मात्र, याच वेळी घडलेल्या एका अनपेक्षित घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रवींद्र चव्हाण आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अक्षय कर्डीले यांची भेट घेण्यापूर्वी थेट माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात पोहोचले. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरूवात झाली आहे. प्राजक्त तनपुरे हे राहुरी मतदारसंघातील एक प्रभावी नेते मानले जातात. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला या पोटनिवडणुकीत विशेष महत्व आहे. सुरूवातीला तनपुरे हे देखील अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, अचानक भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची कार्यालयात उपस्थिती जेणेक प्रश्न निर्माण करत आहे.

Baramati : हाकेंचे ‘मिशन बारामती’ थांबले, सुनेत्रा पवारांच्या एका कॉलने सुरू झाली माघारीची पटकथा

या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, राजकीय जाणकारांच्या मते, ही भेट केवळ औपचारिक नसून त्यामागे काही मोठा राजकीय डाव असू शकतो. भाजपकडून तनपुरे यांना निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे का, किंवा काही वेगळे राजकीय समीकरण आकार घेत आहे का, याबाबत चर्चा रंगली आहे.

दरम्यान, राहुरीत कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण आहे. एकीकडे भाजपकडून अक्षय कर्डीले यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असताना, दुसरीकडे तनपुरे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते प्रत्यक्षात अर्ज दाखल करणार की काही वेगळा निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या साऱ्या घडामोडींमुळे राहुरी पोटनिवडणूक केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणात देखील महत्वाची ठरत आहे. पुढील काही तासांत उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याने चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र सध्याच्या घडामोडींनी या निवडणुकीत अनिश्चिततेचे सावट निर्माण केले असून, राजकीय समीकरणे शेवटच्या क्षणापर्यंत बदलू शकतात, हेच स्पष्ट होत आहे.

Exit mobile version