Baramati : हाकेंचे ‘मिशन बारामती’ थांबले, सुनेत्रा पवारांच्या एका कॉलने सुरू झाली माघारीची पटकथा
Laxman Hake निवडणुकीचे गांभीर्य ओळखून मंत्री दत्तात्रय भरणे यांनी तातडीने हाकेंची भेट घेत शिष्टाईची सूत्रे आपल्या हाती घेतली.
Baramati By Election Laxman Hake Withdraw Form : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत आज एक अत्यंत महत्त्वाची राजकीय घडामोड घडली असून, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी आपला उमेदवारी अर्ज न भरता निवडणुकीतून माघार घेण्याचा नाट्यमय निर्णय घेतला आहे. महायुतीचे नेते आणि माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या प्रभावी मध्यस्थीला मोठे यश आले असून, हाके यांनी आता थेट सुनेत्रा पवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसकडून मैदानात उतरलेले उमेदवार आकाश मोरे कोण?
हाकेंची माघार विरोधकांसाठी मोठा धक्का
स्वतः सुनेत्रा पवार आणि महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या आवाहनानंतर हाके यांनी घेतलेली ही माघार विरोधकांसाठी मोठा धक्का मानली जात आहे. या नव्या राजकीय समीकरणामुळे बारामतीमधील लढत आता अधिक स्पष्ट झाली असून, ही निवडणूक आता थेट सुनेत्रा पवार विरुद्ध काँग्रेसचे आकाश मोरे यांच्यात रंगणार असल्याचे निश्चित झाले आहे. या निर्णयामुळे महायुतीचे पारडे सध्या जड दिसत असून बारामतीचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. Baramati By Election Laxman Hake Withdraw Form
दत्तात्रय भरणे यांची ‘फिल्डिंग’ यशस्वी; भावनिक साद घालत लक्ष्मण हाकेंची मनधरणी!
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आपला उमेदवारी अर्ज भरण्याच्या इराद्याने बारामतीत दाखल झाले खरे, मात्र त्यांच्या आगमनासोबतच महायुतीच्या गोटात वेगवान हालचाली सुरू झाल्या. निवडणुकीचे गांभीर्य ओळखून मंत्री दत्तात्रय भरणे यांनी तातडीने हाकेंची भेट घेत शिष्टाईची सूत्रे आपल्या हाती घेतली. अजितदादांच्या निधनामुळे निर्माण झालेली अत्यंत संवेदनशील आणि भावनिक परिस्थिती, तसेच बारामतीच्या विकासाचा रथ अडकू नये ही भूमिका भरणे यांनी हाकेंसमोर अत्यंत प्रभावीपणे मांडली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी किंवा किमान महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा मिळावा, यासाठी भरणे यांनी केलेली ही ‘फिल्डिंग’ अखेर यशस्वी ठरली आणि बारामतीच्या राजकीय रणांगणातील संभाव्य पेच टळला.
बारामतीपासून भोंदूबाबा प्रकरणापर्यंत तटकरे-जय पवार अॅक्टिव्ह; राष्ट्रवादीची आक्रमक रणनीती स्पष्ट
सुनेत्रा पवारांच्या एका ‘कॉल’ने फिरली राजकीय चक्रे; सन्मानाने लक्ष्मण हाकेंचे पाऊल मागे!
बारामतीच्या राजकारणात आज एका फोन कॉलने संपूर्ण चित्र पालटले. स्वतः सुनेत्रा पवार यांनी लक्ष्मण हाके यांना फोन करून चर्चेचे आवाहन केले आणि तिथूनच माघारीची पटकथा लिहिली गेली. या घडामोडीवर भाष्य करताना हाके म्हणाले की, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि धनंजय मुंडे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता; मात्र जेव्हा खुद्द सुनेत्रा ताईंचा फोन आला, तेव्हा मी विचार करण्यास प्रवृत्त झालो. “इतके सर्व वरिष्ठ नेते आणि स्वतः उमेदवार जर इतक्या अगत्याने संपर्क साधत असतील, तर आपण सकारात्मक विचार करायला हवा,” अशी भावना व्यक्त करत हाके यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
माझ्यासाठी अंतिम कॉल संवेदनशील होता
मला सगळ्या नेत्यांचे कॉल आले. पण माझ्यासाठी अंतिम कॉल जो संवेदनशील होता, तो महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्र्यांचा होता. हा कॉल आल्यानंतर मला वाटलं, येस… महाराष्ट्राची महिला उपमुख्यमंत्री आहे. आपली व्यवस्था ही सहानुभूती, दु:खद निधन, अपघाती निधन, ही जी भावनिक किनार आहे, ती सगळ्या गोष्टींवर मात करुन जाते असे हाके म्हणाले.
प्रश्नांवर ठाम राहणारच – लक्ष्मण हाके
निवडणुकीतून माघार घेतली असली तरी, आपल्या मूळ मुद्द्यांशी तडजोड करणार नसल्याचे हाके यांनी ठणकावून सांगितले. “माझा उमेदवारी अर्ज तयार होता, पण विद्रोहाची भूमिका घेताना काही वेळा परिस्थितीचा विचार करावा लागतो. मी माझ्या ओबीसींच्या प्रश्नांवर आजही ठाम आहे आणि भविष्यातही ते प्रश्न आक्रमकपणे मांडत राहणार,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मोठी बातमी! महविकास आघाडीत फूट, काँग्रेस मैदानात तर ठाकरे गटाचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
“अजितदादाच निवडणूक लढवत आहेत असं समजा”
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने बारामतीमधील पोटनिवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार जाहीर केला आहे. यादरम्यान रोहित पवार यांनी एक सोशल मीडिया पोस्ट करत भावनिक आवाहन केले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मा. सुनेत्राकाकी आज उमेदवारी अर्ज दाखल करतायेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यामुळं उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इतरांना आणि त्यांच्या पक्षालाही ही निवडणूक बिनविरोध करण्याची आमची विनंती आहे आणि ते मान्य करतील असा विश्वास आहे, परंतु तसं झालं नाही तर आजही अजितदादाच ही निवडणूक लढवत आहेत, असं समजून बारामतीकरांनी सुनेत्राकाकींना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावं, असं आवाहन करतो! तुमचं एक मत हीच अजितदादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल..!
बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मा. सुनेत्राकाकी आज उमेदवारी अर्ज दाखल करतायेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यामुळं उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इतरांना आणि त्यांच्या पक्षालाही ही निवडणूक बिनविरोध करण्याची आमची विनंती आहे आणि ते मान्य… pic.twitter.com/wUXsMsQusF
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 6, 2026