अहमदनगर: भारत सरकारच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने खास महिला व मुलीकरिता महिला सन्मान बचत पत्र ही योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेची सुरुवात 1 एप्रिल 2023 पासून देशभरातील सर्वच पोस्ट ऑफिसमधून प्रारंभ करण्यात आली आहे.
केडगाव पोस्टऑफिसमध्ये या योजनेच्या पहिल्या महिला खातेदार मानकरी जयश्री कोतकर आणि दुसऱ्या महिला खातेदार वनिता शिरीष हजारे यांना अहमदनगर डाक विभागाच्या अधीक्षक जी हनी यांच्या शुभहस्ते तर संदिप हदगल सहायक अधीक्षक डाकघर तर संतोष यादव पोस्टमास्तर केडगाव यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक बचत पत्र वितरित करण्यात आले आहे.
यावेळी मोठया संख्येने ग्राहक उपस्थित होते. सदर योजनेस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, अधिक माहिती करिता जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क करावा, असे आवाहन जी हनी डाक अधीक्षक यांनी नगरकरांना केले आहे.
योजनेची वैशिष्ट्ये
● योजना महिला व मुलीकरिता
● बचत पत्राची मुदत 2 वर्ष
● योजनेस व्याज दर 7.5% प्रतिवर्षी राहील.व्याज चक्रवाढ पद्धतीने असेल.
● एका महिलेच्या नावावर किंवा मुलीच्या वतीने तिच्या नावावर तिचे पालक या योजनेचे बचत पत्र घेऊ शकतात.
● किमान गुंतवणूक 1000/- व कमाल गुंतवणूक रु दोन लाख पर्यंत कितीही बचत पत्र घेता येईल.पण दोन खात्यामध्ये किमान तीन महिन्याचे अंतर असले पाहिजे.
● एक वर्ष झाल्यानंतर खात्यातील 40% ,रक्कम एकदाच काढता येईल.
● अपवादात्मक परिस्थितीशिवाय खाते मुदतपूर्व बंद करता येणार नाही.