गोंदिया : तुमच्यातील अनेकांना आश्चर्य वाटत असेल की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) येथे कसे काय, पण मी तुम्हाला सांगतो की राजकारणात इकडच्या तिकडच्या चर्चा होतच असतात. तशी देवेंद्र फडणवीस आणि आमची नेहमीच गुप्त चर्चा होत असते. फडणवीस जिथं येतात, तिथून घेऊन जातात. पण, मी ती चर्चा जर सार्वजनिक केली तर अनेकांना अडचणीचे ठरू शकते, अशी जोरदार टोलेबाजी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा (NCP) खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्या विधानामुळे नव्या राजकीय चर्चाना उधाण आले आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी ‘बात निकली है तो दूर तक जायेगी’, अशी मिश्किल टिपणी केल्याने राज्यात पुन्हा एकदा नव्याने राजकीय उलथापालथ होणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही गोंदिया येथे एका कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर एकत्र आल्याने चर्चेला उधाण आले. याप्रसंगी काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांनी देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला आलेत म्हणजे ते नक्की प्रफुल पटेल यांना घेऊन जाणार आहे, असे वक्तव्य केल्याने या चर्चेत आणखीनच भर पडली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी प्रफुल पटेलांच्या कार्यक्रमात आलो आहे म्हणजे चर्चा तर होणारच आहे चर्चा सुरु झाली म्हटल्यावर ती लांब पर्यंत नक्की जाणार हे मात्र नक्की आहे. पण त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती आहे. त्यामुळे आम्ही चहासाठी आम्ही एकत्र भेटत असतो. राजकारणात आम्ही एकमेकांच्या विरोधात लढत असतो. पण म्हणून आम्ही कोणाही व्यक्तीच्या विरोधात नाही तर आमची लडाई ही विचारांची लडाई आहे. त्यामुळे ही संस्कृती आपण जपत असतो.
दोनच दिवसांपूर्वी अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी नजिकच्या काळात विरोधी पक्षातील १० ते १५ आमदारांचा भाजप आणि शिंदे गटामध्ये प्रवेश होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवल्याने आणि आजच्या गोंदियातील कार्यक्रमामुळे दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे.