Download App

Prakash Ambedkar : नरेंद्र मोदी यांची वाटचाल हिटलर शाहीकडे

पुणे : आधी देशातील विरोधी पक्षनेतृत्व संपवले. मग स्वतःच्याच पक्षातील नेतृत्व संपवले. कारण भाजपमध्ये मोदींनंतर दुसरा नेता कोण, हे कोणालाच समजत नाही, असा थेट आरोप करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची वाटचाल ही हिटलर शाहिकडे सुरु आहे, असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केला आहे. तसेच देशात लोकशाही हवी की नको आता हे लोकांनी ठरवायचे आहे. मोदी यांची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू असल्याची मी एक नाही तर दहा कारणे तुम्हाला दाखवून देईल, त्यामुळे आता लोकशाही हवी की नको हे लोकांना स्वतः ठरवावे लागणार आहे, असे आंबेडकर म्हणाले.

एका खासगी वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. प्रकाश आंबेडकर म्हणाले, की देशात सध्या कॅबिनेट चर्चा होत नाही. मी म्हणेल तसेच होईल, या पद्धतीने काम सुरु आहे. देशात लोकशाही पद्धतीने मतदान प्रक्रियेतून निवडलेले ५५० हुन अधिक खासदार यांना काही अधिकार दिले जात नाही. त्यांना कोणत्याही चर्चेत सहभागी करून घेतले जात नाही. मंत्री तर नावालाच आहेत. त्यांचीही तीच परिस्थिती आहे. कोणताही नवा कायदा करण्याबाबत किंवा नवीन प्रकल्प करण्याबाबत कॅबिनेटमध्ये खासदारांसोबत चर्चाच केली जात नाही.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे या देशात प्रशासकीय रचना निवडण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नावाची स्वायत्त संस्था आपल्याकडे अस्तित्वात आहे. मात्र, देशातील मोठमोठ्या आणि महत्वाच्या पदांवर आपल्या मर्जीतील लोकांची थेट नियुक्ती पंतप्रधान मोदी करत आहे. अशाच प्रकारे भाजप शासित राज्यांमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्वोच्च न्यायालय असो की उच्च न्यायालय किंवा खंडपीठात न्यायाधीशांची नेमणूक करण्यासाठी निवड करताना न्याय प्रक्रियेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यात समावेश असतो. मात्र, आता त्यांना विचारत न घेता परस्पर आपल्या मर्जीतील लोकांना उच्च पदांवर बसवले जात आहे. चौथा मुद्दा देशाच्या संसदेत किंवा राज्यसभेत देशाच्या भविष्याच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी कोणत्याही महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केली जात नाही. होऊ दिली जात नाही, ही सर्व लक्षणं हिटसर याच्या कार्यशैलीशी सुसंगत आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ही मनुस्मृतीचा पुरस्कार करणारी संघटना आहे. भाजप ही त्यांचीच राजकीय संघटना, पक्ष आहे. हुकूमशाही प्रवृत्तीतून त्यांना या देशातील सर्व स्वायत्त संस्था असो की खासगी संस्थावर आपला ताबा आणायचा आहे. सध्या देशाच्या पंतप्रधानांची वाटचाल ही हिटलर शाहीकडे सुरू असल्याचे वरील बाबी तपासल्या तर आपल्या लक्षात येतात, असे देखील प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

Tags

follow us