पुणे : स्वतंत्र्यावीर सावरकर हे सर्वांचे हिरो आहेत. याबद्दल दुमत नाही. त्यांनी अंदमानमध्ये यातना भोगल्या हेही खरे आहे. मात्र, सावरकरांच्या हिंदू महासभेने त्याकाळी सातारा, सांगली, कोल्हापूर, कारवार, निपाणी या परिसरातील क्रांतीकारकांना पकडून इंग्रजांच्या ताब्यात दिले. हे विसरून चालणार नाही. नेमके हेच काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांना माहिती नाही. त्यांनी आधीचे सावरकर पकडले नाही. तर केवळ शेवटचे सावरकर पकडले आहेत. सध्या ते ‘भारत जोडो’ यात्रा करत आहेत. पण देश तुटला आहे का, हे तर समजून घ्या. उगाच काहीतरी बेसलेस करायचे. त्यामुळे त्यांच्याकडे काही विचार नाही, असा स्पष्ट आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केला.
एका खासगी वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर बोलत होते. आंबेडकर म्हणाले की, राहुल गांधी यांचा विचारच मला कळलेले नाही. त्यामुळे मी त्यांच्याकडे का जाऊ. कारण भारत आता काही तुटलेला नाही. त्यामुळे ‘भारत जोडो’ यात्रा काढण्याचे प्रयोजन काय आहे. त्याला आधार काय आहे. राहुल गांधी साडेचार हजार किलोमीटर चालले त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःची सिरीयस राजकारणी अशी इमेज तयार केली आहे. मात्र, यापुढे त्यांना ती तशीच ठेवावी लागणार आहे. अन्यथा पुन्हा माझ्या ये रे मागल्या… अशी स्थिती होईल, असा टोला आंबेदकर यांनी राहुल गांधींना लगावला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रा करत आहेत. अरे बाबा भारत तुटला आहे का, आधी ते पहा. तुटला असेल तर किती तुटलाय ते पहा, मग जोड. भारत जोडायचाच असेल तर आधी जाती अंत कर. कारण भारत जाती-जातीत विभागला आहे. जाती जातीतील दरी आधी मिटवा. तरच देश आपोआप जोडला जाईल.