Download App

Prakash Ambedkar : आरएसएसला देशात पुन्हा मनुस्मृती आणायचीय 

पुणे : देशाचे संविधान, घटना मानायची नाही. नव्या व्यवस्थेच्या नावाखाली जुनीच पण तुम्हाला हवी असलेली मनुस्मृती आणण्याचे प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारतीय जनता पार्टी (BJP) यांच्या कृतीतून दिसत आहे. गेल्या काही वर्षातील त्यांची वाटचाल, कृती हे आपल्याला स्पष्टपणे हेच सांगत आहे. माणसाला धर्म असतो. देशाला धर्म नसतो, असे आम्ही मानणारे लोकं आहोत. तर याउलट घटना बाजूला करुन देशाला धर्माशी जोडण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुरु असून त्या माध्यमातून त्यांना पुन्हा एकदा मनुस्मृती या देशात आणायची आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला.

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एकीकडे संविधान मानायचे नाही. तर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे असे दाखवायचे, असे चित्र सध्या भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे आहे. पण ही गोबेल्स निती त्यांची जुनीच आहे. जी गोष्ट आपल्याला आवडत नाही, अडचणीची आहे. नेमकी तीच स्वीकारायची आणि आपला हेतू साध्य करायचा. हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आजपर्यंत करत आला आहे.

वंचित आघाडीने राज्यात मागील निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडले. तेव्हापासून तुमच्यावर तुम्ही प्रो-भाजपा असल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत तुमची काय भूमिका असते. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, की मला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. मी माझ्या तत्वाने राजकारण करणारा माणूस आहे. हे असे आरोप करणारे जे कोणी लोकं आहेत. मी त्यांच्यावर असेच आरोप करू शकतो. त्यांच्यामुळे आमचे १० पेक्षा अधिक मतदार संघात उमेदवार निवडून येऊ शकले नाहीत. मी आजही एसटी, रेल्वेने प्रवास करतो. मी जर असे काही केले असते तर मला केव्हाच या लोकांनी जेलमध्ये टाकले असते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आमची कोणाशी दुश्मनी नाही. या देशात अस्तित्वात असलेल्या संविधान, घटना मानून जो पुढे जाईल. आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहोत. मग त्यात भाजप जरी असली तरी काही हारकत नाही. मात्र, भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वैदिक धर्मातून गुलामगिरी निर्माण केलेली आहे. या वैदिक धर्माच्या आधारे ते देशातील इतर वंचित घटकांवर अन्याय, अत्याचार करणे आणि त्यांना पुन्हा गुलाम बनवणे, या उद्देशाने त्यांची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे आम्ही त्यांना विरोध करतच राहणार आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज