Prakash Ambedkar on Thackeray : शिंदे आणि ठाकरे यांचा समझोता होऊन त्यांची कल्याण लोकसभेसाठी नुरा कुस्ती सुरू असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते प्रचार सभेत बोलत होते. तसंच, राजन विचारे यांचं पाठींब्यासाठी कोणतंही पत्र आलं नसल्याचंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरेसेना एकत्र येतील असा खळबळजनक दावाही आंबेडकर यांनी केला आहे.
ठाकरे सेनेवर टीका
ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण व भिवंडी या ३ लोकसभांपैकी कल्याण लोकसभेत वंचित आघाडीने डॉ. मोहम्मद शहाबुद्दीन शेख यांना रिंगणात उतरविलं असून त्यांच्या प्रचारार्थ आंबेडकर यांनी सभा घेतली. ठाकरेसेनेचे ठाणे उमेदवार राजन विचारे यांनी पाठिंब्यासाठी पत्र देण्याच्या वृत्ताला प्रकाश आंबेडकर नकार दिला. तसंच, सभेत त्यांनी मोदींसह ठाकरे सेनेवर टीका केली.
नुरा कुस्ती सुरू
ताज्या सर्वेक्षणात मोदी ४०० पार नव्हे तर २८० वर आकडा जात आल्याचं आंबेडकर म्हणाले. तर कल्याण लोकसभेत शिंदे व ठाकरे यांच्यात अंतर्गत समझोता होऊन नुरा कुस्ती सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसंच, निवडणुकीनंतर मोदी व ठाकरे सेना एकत्र येण्याचं भाकीतही त्यांनी व्यक्त केलं.
अप्रत्यक्ष मृत्यू दिल्याची टीका
मोदींच्या आर्थिक नितीमुळे देश पाकिस्तानच्या दिशेने जात असून देशावरील कर्ज पाहता यापुढे देश चालवंणं मुश्किल होणार आहे. यातूनच भारताचे ९ रत्न धोक्यात येऊन रेल्वेचे ७० टक्के खाजगीकरण होऊन ३० टक्के शासनाच्या मालकीची आहे. एकूणच मोदींची अवस्था गल्लीतील दादा व दारुड्या सारखा झाल्याची टिका आंबेडकर यांनी केली आहे. तसंच, कोविड काळात जागतिक आरोग्य संघटनेने बंदी घातलेल्या लशी नागरिकांना देऊन, नागरिकांना अप्रत्यक्ष मृत्यू दिल्याची टीकाही त्यांनी केली.