पुणे : सध्या मीडियामधून बातम्या ट्विस्ट केल्या जात आहेत. आपली बदनामी सुरू आहे. मीडियाने ते थांबवावं अन्यथा सत्ता परिवर्तनानंतर मीडियाला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यात तू तू मैं मैं सुरू आहे. त्याबाबत युतीचा नव्यानेच घटक झालेल्या मित्र पक्षाच्या नेत्या विषयी बोलताना संजय राऊत यांनी तारतम्य बाळगण्याची आवश्यकता आहे. तसेच एकमेकांना गुणदोषांसह स्वीकारलेला असताना राजधर्माचे पालन होण्याची गरज आहे, असे मतही ॲड. आंबेडकर यांनी व्यक्त केले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात सुरू असलेल्या वाक्युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
आगामी काळातील निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपल्या सोबत आहे का, याविषयी अजूनही संभ्रम आहे. त्यांनी सोबत यावं यासाठी उद्धव ठाकरे हेच बोलणी करतील. त्याबाबत आपण या पुढच्या काळात चर्चेपासून दूर राहणार असल्याचही आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.
आगामी काळात भारतीय जनता पक्षाला पराभूत करायचं असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि वंचित बहुजन अशा सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. सगळे एकत्र आले तर पुढील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला २०० पेक्षा जास्त जागा मिळतील. काँग्रेस, राष्ट्रवादी आमच्या सोबत आले नाही तर शिवसेना आणि वंचित मिळून १५० चा आकडा पार करेल, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.