नसरापूर दुर्घटनेने संतापले प्रवीण तरडे; अशा नराधमांना चेचणारा सिनेमा बनवणार, ‘देऊळ बंद’च्या पुढील भागाची घोषणा

येणाऱ्या काळात अशा नराधमांना धडा शिकवणारा आणि समाजाला हादरवून जागं करणारा चित्रपट बनवण्याची घोषणा देखील त्यांनी केली.

Untitled Design 96

Untitled Design 96

Praveen Tarde angry over Nasrapur accident : पुण्याच्या नसरापूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी देखील अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरात आयोजित देऊळ बंद 2 चा टिझर प्रदर्शन सोहळ्यात बोलताना त्यांनी समाजात वाढत चाललेल्या विकृत मानसिकतेवर कठोर शब्दांत निशाणा साधला. इतकंच नव्हे, तर येणाऱ्या काळात अशा नराधमांना धडा शिकवणारा आणि समाजाला हादरवून जागं करणारा चित्रपट बनवण्याची घोषणा देखील त्यांनी केली.

कार्यक्रमात बोलताना प्रवीण तरडे म्हणाले की, मी एक फिल्ममेकर आहे. या घटनेबद्दल मी माझी उद्दीग्न प्रतिक्रिया दिली होती आणि त्यावरून मोठा गदारोळही उठला. मात्र शेवटी मी देखील माणूसच आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीच्या वडिलांना विचारा, ती बातमी पाहिल्यानंतर त्यांच्या मनात काय वेदना निर्माण झाल्या असतील. समाजातील वाढत्या अत्याचारांच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जे सध्या चाललंय, ते अत्यंत भयावह आहे. आता अशा नराधमांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे.

त्यांनी आपल्या आगामी चित्रपट मालिकेचा उल्लेख करत सांगितले की, देऊळ बंद या सिनेमाचे मी पुढे 11 भाग करणार आहे. त्या भागात अशा नराधमांना चेचण्यासाठी स्वतः स्वामींनाच यावं लागेल. प्रवीण तरडे यांनी आपल्या चित्रपटांमधून समाजातील विकृतींवर प्रहार करण्याचा निर्धार व्यक्त केला. माझ्या सिनेमात कायदा-बियदा असं काही नसेल. कारण जेव्हा स्वामी शिक्षा द्यायला उतरतात, तेव्हा त्यांची शिक्षा भयानक असते, असे वक्तव्य करत त्यांनी उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडवून दिली. त्यांनी पुढे असे देखील म्हटले की, स्वामींनी तो प्रकार पहिला असेल. त्यामुळे त्या नराधमांना असा मृत्यू येईल की पुन्हा कोणी असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही.

या निमित्ताने त्यांनी चित्रपट हे केवळ मनोरंजनाचं माध्यम नसून समाजाला जागं करण्याचं प्रभावी शस्त्र असल्याचं देखील अधोरेखित केलं. मुळशी पॅटर्न चित्रपटानंतर शेतकऱ्यांच्या जमिनी धाकदपटशाहीने घेण्याच्या प्रकारांवर काही प्रमाणात आळा बसला. त्या चित्रपटाने शेतकऱ्यांना खडबडून जागं केलं. त्याचप्रमाणे आता समाजातील अशा विकृत प्रवृत्तींना रोखण्यासाठी देखील चित्रपट माध्यमातून आवाज उठवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

नसरापूर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर व्यक्त झालेल्या या भावना सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात चर्चेत आल्या आहेत. प्रवीण तरडे यांच्या वक्तव्यामुळे एकीकडे संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना, दुसरीकडे समाजातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी देखील तीव्र होताना दिसत आहे.

Exit mobile version