Priesident Draupadi Murmu at Nagapur : जल, जमीन आणि जंगलाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासींना संघर्षाला सामोरे जावे लागते. आदिवासींनी न्यूनगंड सोडून शिक्षित होत संघर्ष करून पुढे गेले पाहिजे व स्वतःचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास साधतांनाच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने आपल्या समाज बांधवांचाही विकास केला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज विविध आदिवासी जमातींच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना केले.
नागपूर येथील राजभवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदिवासी समुहातील माडिया,कातकरी आणि कोलाम जमातींच्या प्रतिनिधींशी (आदिम जनजाती समूह) संवाद साधला. राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यावेळी उपस्थित होते.
‘शाळेत जायला रस्ते नव्हते, दप्तर नसायचे, डोक्यावर कापडी पोतं पांघरून भर पावसाळ्यात शाळेत जावे लागायचे. पदोपदी संघर्ष होता. दर मजल करत यश संपादन करून शिक्षिका, राज्यपाल आणि देशाची राष्ट्रपती झाले’, अशा शब्दात राष्ट्रपतींनी आपला जीवनप्रवास उलगडला. तो ऐकतांना सारेच उपस्थित भारावले होते. आदिवासींनी न्यूनगंड न बाळगता शालेय व उच्च शिक्षण घेतले पाहिजे. उच्चपदे भूषवून आपल्या समाज बांधवांनाही विकासाच्या प्रवाहात पुढे नेले पाहिजे, असे उद्बोधक मार्गदर्शन राष्ट्रपतींनी केले.
न्यूनगंड हा आदिवासींच्या शिक्षणापुढील सर्वात मोठा अडसर असल्याचे अधोरेखित करतांना स्थानिक आदिवासी शिक्षित मुलांकडून प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले जावे, अशा सूचना राष्ट्रपतींनी केल्या. याविषयी त्यांनी शिक्षिका असतांना राबविलेले आनंददायी शिक्षण उपक्रमांबाबत अनुभव कथन केले.
अॅवार्डसाठी शाहरूखने देऊ केली होती लाच; मुलाखतीत केला धक्कादायक खुलासा
यावेळी उपस्थित आदिवासी प्रतिनिधीपैकी तिघांनी प्रातिनिधीक स्वरुपात राष्ट्रपतींशी संवाद साधला. सर्वप्रथम गडचिरोली जिल्ह्यातील पहिले आदिवासी डॉक्टर असलेले डॉ.कन्ना मडावी यांनी, माडिया जमातीचे प्रतिनिधी म्हणून विचार व्यक्त केले. आदिवासींना त्यांच्या बोलीभाषेत प्राथमिक शिक्षण मिळावे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. विकास करतांना आदिवासींचा प्राण असणारी जंगले वाचली पाहिजेत, आदिवासी शाळांमध्ये पुरेशे शिक्षक असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .