Prithviraj Chavan’s reaction to the students’ agitation : छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थी चळवळीच्या पुढील वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण बैठक होत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या आंदोलनावर सविस्तर भाष्य केले. विद्यार्थी आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, ही अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक घटना असल्याचे त्यांनी म्हटले. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, या आंदोलनाची तुलना लगेच जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाशी करता येणार नाही. कारण त्या आंदोलनामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा पराभव झाला होता.
मात्र, विद्यार्थ्यांच्या या चळवळीने केंद्र सरकारला माघार घ्यायला भाग पाडले, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांवर या आंदोलनाचा परिणाम होतो का, हे पाहावे लागेल, असे ते म्हणाले. चव्हाण यांच्या मते, या आंदोलनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही जाती, धर्म, प्रांत किंवा राजकीय विचारसरणीच्या चौकटीत अडकलेले नव्हते. देशभरातील विद्यार्थी आणि पालक परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात एकत्र आले. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या प्रश्नावर शांततामय मार्गाने आंदोलन करण्यात आले आणि त्यातून सरकारला जबाबदारी स्वीकारावी लागली.
गेल्या बारा वर्षांत केंद्र सरकारमधील मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्याची उदाहरणे अत्यंत कमी आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या दबावामुळे केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा झाला, हे आंदोलनाच्या यशाचे मोठे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे या आंदोलनामागे कोणतेही मोठे राजकीय पाठबळ, आर्थिक मदत किंवा संघटनात्मक ताकद नव्हती. विद्यार्थ्यांच्या एकजुटीच्या बळावर ही लढाई उभी राहिली, असे ते म्हणाले.
आधी तरुणांना ऐका, मग ते तुम्हाला ऐकतील; जनरेशन झेडबाबत मोदींचा खासदारांसाठीचा खास सल्ला चर्चेत
या आंदोलनाने सरकारवर दबाव का निर्माण केला, याबाबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी तीन प्रमुख कारणे सांगितली. पहिले म्हणजे हे आंदोलन केवळ विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी होते. दुसरे म्हणजे त्यामागे कोणताही राजकीय स्वार्थ नव्हता. आणि तिसरे म्हणजे ते देशव्यापी स्वरूपात उभे राहिले. यापूर्वीची अनेक आंदोलने विशिष्ट समाज, प्रदेश किंवा घटकांपुरती मर्यादित होती. मात्र, ही चळवळ विद्यार्थ्यांच्या हितासाठी देशभरात उभी राहिली. केंद्र सरकारने सुरुवातीला आंदोलन गांभीर्याने घेतले नाही, असा आरोपही चव्हाण यांनी केला.
आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला, पोलिसी कारवाई करण्यात आली, अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांवर लाठीमार झाल्याच्या घटना घडल्या. मात्र, त्यामुळे विद्यार्थ्यांचा रोष आणखी वाढला आणि आंदोलन अधिक तीव्र झाले. अखेर सरकारला माघार घ्यावी लागली, असे त्यांनी म्हटले. आता या आंदोलनानंतर विद्यार्थ्यांचा रोष कोणत्या दिशेने जाईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे. विरोधी पक्ष या नाराजीचे राजकीय भांडवल करणार की भाजप विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याचा प्रयत्न करणार, हा पुढील काळातील महत्त्वाचा प्रश्न असेल, असे चव्हाण म्हणाले. आजचे विद्यार्थीच उद्याचे मतदार आहेत आणि त्यांच्या भावना दुर्लक्षित करणे कोणत्याही पक्षाला परवडणारे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थी चळवळीच्या भवितव्याबाबत बोलताना त्यांनी सावध भूमिका मांडली. या चळवळीतील काही प्रमुख चेहरे पूर्वी राजकीय पार्श्वभूमी असलेले आहेत. भविष्यात या आंदोलनातून राजकीय महत्त्वाकांक्षा पुढे आली तर चळवळीचे स्वरूप बदलू शकते. मात्र, ही चळवळ विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपुरती मर्यादित राहिली तर ती देशातील सर्वात प्रभावी सामाजिक चळवळींपैकी एक ठरू शकते, असे ते म्हणाले. परीक्षा व्यवस्थेतील गोंधळ आणि पेपरफुटीच्या घटनांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Polymer Currency : प्लास्टिकच्या नोटा हाती येण्याची तारीख ठरली; MPC बैठकीनंतर RBI ची मोठी घोषणा…
समित्या नेमणे आणि अहवाल सादर करणे यापलीकडे जाऊन ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याची हमी देणारी यंत्रणा उभी करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नेतृत्वावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकेल, त्यांचा विश्वास जिंकू शकेल आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांना प्राधान्य देईल असा सक्षम शिक्षणमंत्री देशाला मिळण्याची आवश्यकता असल्याचे चव्हाण म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात नेण्याच्या चर्चांवर बोलताना त्यांनी ही केवळ राजकीय अटकळ असल्याचे म्हटले. भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा तो भाग असू शकतो, मात्र सध्या तरी त्याबाबत ठोस संकेत दिसत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकूणच, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने केंद्र सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडले आणि देशाच्या राजकीय व्यवस्थेला एक स्पष्ट संदेश दिला आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासंदर्भातील प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे दूरगामी राजकीय परिणाम होऊ शकतात, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
