Beed Administration : सध्या बीड जिल्ह्यात अनेक अधिकाऱ्यांचं या ना त्या कारणाने निलंबन झालं आहे. पोलीस दलात पीएसआयचं नुकतच निलंबन करण्यात आलं आहे. रणजीत कासले (Beed) असं या पीएसआयचं नाव असून परराज्यात तपासासाठी गेला असता त्याने तडजोड करत पैसे घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला. यानंतर हा विषय राज्यस्तरापर्यंत पोहोचला होता. या प्रकरणाची चौकशी करत आता कासले यांच्या निलंबनाचे आदेश नवनीत कावत यांनी काढले आहेत.
यामध्ये निलंबनाचे आदेश निघताच कासले यांनी वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल केले. पोलीस अधिकारी तसंच विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांवर देखील आरोप करत या सगळ्यांची चौकशी करावी अशी मागणी केली. कालच बीड पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आता ही कारवाई झाल्याने याची चर्चा होऊ लागली आहे.
कोरोना काळातील औषध खरेदी व भरती प्रक्रियेतील अनियमिततामुळे बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांचंही कालच निलंबन झालं आहे. केजच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी त्याच्याविषयी तक्रारी विधानसभेत मांडल्यानंतर
आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी थोरात यांच्या निलंबनाची घोषणा केली.
बीडमध्ये सुसज्ज विमानतळ उभारणार! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधिमंडळात अधिकृत घोषणा
कोरोनाकाळात डॉ.अशोक थोरात यांचे काम चांगले होते. त्यानंतर त्यांची नाशिक येथे बदली झाली. त्यानंतर डॉ.सुरेश साबळे, डॉ.सुर्यकांत गिते आदींनी सीएस म्हणून कारभार घेतला. याच काळात अनियमितता झाली. याची चौकशी करण्यात आली. यामध्ये डॉ.थोरात यांच्यासह डॉ.साबळे, डॉ.गित्ते आणि इतर ९ जणांचा समावेश होता. याच अनुषंगाने आ.मुंदडा यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यानुसार मंत्री आबीटकर यांनी थोरात यांचे निलंबण करत असल्याचे सांगितले. परंतू इतर ११ जणांबाबत त्यांनीही काहीही घोषणा केली नाही.
सतीश भोसले उर्फ खोक्या याला कारागृह परिसरात व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याचं समोर आलं होतं. खायला बिर्याणी आणि हात धुवायला बंद बाटलीतील पाणी, सोबत डझनभर नातेवाइक असा लवाजमा असलेला एक कथित व्हिडीओ सोमवारी सायंकाळी व्हायरल झाला होता. यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी चकलांबा पोलीस ठाण्यातील कैलास खटाणे आणि विनोद सुरवसे यांना निलंबीत केलं आहे.
फेरफार प्रलंबित ठेवून शासकीय कामकाजाकडे दुर्लक्ष केलं, या प्रकरणी बीड तालुक्यातील लिंबागणेशचे मंडळ अधिकारी अशोक गोरख डरफे यांना जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी शासन सेवेतून काही दिवसांपूर्वी निलंबीत केलं आहे. ५ मार्च रोजी गेवराई येथे प्रलंबित फेरफारबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मंडळ अधिकारी अशोक डरफे यांच्याकडे ५६ फेरफार प्रलंबित असल्याचे दिसून आले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.