पुणे महापालिकेच्या 2026-27 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 13 हजार 995 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आज महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीकडे सादर केले. शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देत पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक, शिक्षण आणि कचरा व्यवस्थान यांसारख्या महत्वाच्या विभागांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.
महापालिकेच्या या अंदाजपत्रकात शहरातील वाढत्या लोकसंख्येचा आणि वाढत्या नागरी गरजांचा विचार करून विविध विकास प्रकल्पांसाठी मोठा निधी राखून ठेवण्यात आला आहे. विशेषतः पायाभूत सुविधा आणि मूलभूत सेवांवर अधिक भर देण्यात आल्याचे या अंदाजपत्रकातून स्पष्ट होत आहे. शहरातील नागरिकांना सुरळीत आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी सर्वाधिक 2077 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी वाढत असल्याने जलपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर महापालिकेचा भर राहणार आहे.
याशिवाय शहरातील सांडपाणी व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी मलनिस्सारण प्रकल्पांसाठी 1266 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. स्वच्छता आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी या प्रकल्पांना महत्व दिले जात आहे. शहरातील रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेच्या विकासासाठी देखील मोठी तरतूद करण्यात आली आहे. पथ विभागासाठी 1866 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून रस्ते दुरुस्ती, नवीन रस्ते आणि वाहतूक सुलभ करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. याशिवाय शहरातील वाहतूक नियोजन आणि विविध वाहतूक प्रकल्पांसाठी 740 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
स्वच्छ शहराच्या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापनासाठी 1390 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्प, कचरा संकलन व्यवस्था आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांवर या निधीतून काम केले जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्राला देखील या अंदाजपत्रकात महत्व देण्यात आले आहे. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागासाठी 979 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून शाळांची पायाभूत सुविधा, डिजिटल शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांवर खर्च केला जाणार आहे.
लांडगे, जगताप अन् राणे यांच्याप्रमाणे मेधा कुलकर्णी आता हिंदुत्वाचा चेहरा होणार?
याशिवाय भवन रचना विभागासाठी 650 कोटी रुपये, विद्युत विभागासाठी 265 कोटी रुपये तर समाज विकास विभागासाठी 143.50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील सार्वजनिक बांधकामे, विद्युत सुविधा आणि सामाजिक कल्याणाच्या विविध योजनांसाठी हा निधी वापरला जाणार आहे. हरित पुणे घडवण्यासाठी उद्यान विभागासाठी 205 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. शहरातील उद्याने, हरित पट्टे आणि सार्वजनिक मोकळी मैदाने विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.
आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी आरोग्य विभागासाठी 88 कोटी रुपये तर शहर नियोजनासाठी नगर रचना विभागासाठी 64.50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी पर्यावरण विभागाला 51.59 कोटी रुपये देण्यात आले आहेत. डिजिटल प्रशासन आणि स्मार्ट सिटीच्या दृष्टीने माहिती व तंत्रज्ञान विभागासाठी 56.73 कोटी रुपयांचा निधी राखण्यात आला आहे. तसेच शहराच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी हेरिटेज सेलसाठी 28.50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
संस्कृती आणि कला क्षेत्राच्या विकासासाठी महापालिकेच्या सांस्कृतिक केंद्र विभागासाठी 171.31 कोटी रुपयांच्या निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यगृहे आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या विकासासाठी हा निशी वापरला जाणार आहे. एकूणच, पुणे महापालिकेचे हे अंदाजपत्रक शहराच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासोबतच पर्यावरण, शिक्षण, संस्कृती आणि नागरिकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये संतुलित निधी वाटप करणारे असल्याचे दिसून येत आहे. स्थायी समितीच्या चर्चेनंतर या अंदाजपत्रकावर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
