युट्यूबर संतोष पंडित अटकेत; चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह व्हिडीओ करणं भोवलं

YouTuber Santosh Pandit पुण्यातील कोथरूडमधील युट्यूबर संतोष पंडित यांना आक्षेपार्ह आणि बदनामीकारक व्हिडीओ प्रकरणी पोलिसांनी अटक केली.

YouTuber Santosh Pandit

YouTuber Santosh Pandit

Pune YouTuber Santosh Pandit Arrested : पुण्यातील कोथरूड परिसरात विकासकामांवरून प्रश्न उपस्थित करणारे युट्यूबर संतोष पंडित यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर तसेच व्हिडीओ प्रसारित केल्याच्या आरोपावरून कोथरूड पोलिसांनी त्यांना अटक केली. 3 सप्टेंबरला रात्री 1 वाजता पंडित यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या राहत्या ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेतले.

भाजपच्या नगरसेविकेची धमकी; मी ‘त्याला’ जिवंत जाळणार, नेमकं प्रकरण काय?

मंत्री चंद्रकांत पाटील आणि मिताली साळवेकर यांच्याबाबत संतोष पंडित यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवरून आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित केल्याचा आरोप आहे. या व्हिडीओमधून संबंधितांची बदनामी झाल्याचा दावा करत सारिका कांबळे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी पंडित यांच्याविरोधात गुन्हा नोंदवत पुढील कारवाई केली.

कोणत्या कलमांनुसार गुन्हा?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष पंडित यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 75(1)(iv), 75(3), 356(2) आणि 352 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 67 अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अनिल माने यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

विकासकामांवरून प्रश्न, त्यानंतर अटकेची कारवाई

संतोष पंडित हे कोथरूडमधील विकासकामांबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करत असतात. अलीकडेच त्यांनी कारच्या नंबर प्लेटच्या मुद्द्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनाही जाब विचारला होता. त्यानंतर लगेचच त्यांच्या अटकेची बातमी समोर आल्याने पुण्यात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

…तर लगेच उपोषण सोडतो, मनोज जरांगेचा राज्य सरकारला शेवटचा अल्टिमेटम

पोलिसांच्या माहितीनुसार, 3 सप्टेंबरच्या रात्री 1 वाजून 28 मिनिटांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांचे पथक संतोष पंडित यांच्या राहत्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना अटक करण्यात आली. संबंधित व्हिडीओमध्ये विकासकामांबाबत प्रश्न उपस्थित करताना आक्षेपार्ह किंवा अश्लील शेरेबाजी करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सध्या कोथरूड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Exit mobile version