Radhanagari Dam Water Release : राधानगरी येथील राधानगरी धरण (लक्ष्मी तलाव) आज रात्री दहा वाजता पूर्ण क्षमतेने भरून दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले. यातून २ हजार ८५६ व विज निर्मितीसाठी १ हजार ५०० असे ४ हजार ३५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू झाला आहे. भोगावती व पंचगंगा नदी काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हे धरण 99 टक्याहून अधिक क्षमतेने भरले होते. केवळ अर्धा फूट पाणी पातळी कमी होती. पावसाचा व वाऱ्याचा जोर वाढल्याने रात्री दहा वाजून एक मिनीटानी क्रमांक तीन व दहा वाजून विस मिनीटानी क्रमांक सहाचा दरवाजा खुला झाला. गेल्यावर्षीही आज २५ जुलैलाच धरण भरून स्वयंचलीत दरवाजे खुले झाले होते. गेल्या चार दिवसांपासून विश्रांती दिलेल्या पावसाने जिल्ह्यात आज जोरदार हजेरी लावली. शहरात हलक्या सरी कोसळल्या, तर गेल्या चोवीस तासांत धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली.
राज्यात पावसाच आगमन; दोन दिवस वादळी जोर कायम राहणार; हवामान विभागाने काय दिला अंदाज?
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरात तब्बल अडीच फूट वाढ झाली. दरम्यान, अद्याप आठ बंधारे पाण्याखाली आहेत. म्हाताऱ्या पावसाचे नक्षत्र गेल्या पाच दिवसांपूर्वी निघाले आहे. परंतु, पावसाचा जोर काही दिसला नाही. काल रात्रीपासून अचानक पावसाच्या जोरदार सरी जिल्ह्यात सर्वत्र कोसळल्या. आज सकाळी शहरातही हलक्या सरी पडल्या.
दिवसभरात अधूनमधून अशा सरी कोसळत राहिल्या. दरम्यान, जिल्ह्यातील धरण क्षेत्रांत गेल्या चोवीस तासांत अतिवृष्टी झाली. यामध्ये कुंभी, घटप्रभा, पाटगाव, कासारी, धामणी, कोदे आदी धरण क्षेत्रांत ६५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडला. यामुळे नद्यांच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सकाळी १८ फूट असणारी पंचगंगेची पाणी पातळी रात्री २० फूट सहा इंचांवर पोहोचली. अद्याप पंचगंगेवरील राजाराम बंधाऱ्यासह सहा, दूधगंगा नदीवरील एक, वारणा नदीवरील दोन बंधारे पाण्याखाली आहेत.