मुंबई : परभणीतील हिंसाचारानंतर (Parbhani violence) अनेक नेत्यांनी परभणीला भेट दिली. काल ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणीला भेट दिली आणि सोमनाथ सुर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) देखील उद्या सोमवारी परभणीच्या दौऱ्यावर आहेत. परभणी दौऱ्यात राहुल गांधी हे सोमनाथ सुर्यवंशी (Somnath Suryavanshi) आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत.
राहुल गांधी विशेष विमानाने दुपारी 12.30 वाजता नांदेडला पोहोचतील, नांदेडहून ते कारने परभणीला जातील. दुपारी 2.15 ते 3.15 वाजेपर्यंत ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील आणि त्यानंतर विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत. या दोन्ही कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी नांदेडकडे प्रयाण करतील आणि संध्याकाळी 5.15 वाजता दिल्लीला रवाना होतील.
बीडमध्ये नवीन सिंघम, सरपंच हत्या प्रकरणाचा तपास करणारे नवनीत कॉवत कोण?
यावेळी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. विजय वडेट्टीवार, आ. अमित देशमुख, खा. रवींद्र चव्हाण, खा. डॉ. कल्याण काळे, डॉ.शिवाजी काळगे, प्रदेश उपाध्यक्ष संघटना व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश वरपुडकर, एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
परभणीत संविधानाची विटंबना झाल्यानंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत लोकांना अमानुष मारहाण केली आणि निरपराध लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून अटक केली. सोमनाथ सुर्यवंशी या तरुणालाही अटक केली होती. त्यांचा कोठडीत मृत्यू झाला. या प्रकरणात शांतता प्रस्थापित करत असताना विजय वाकोडे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.
नौटंकी बंद करा अन् समाजाला न्याय द्या… – बावनकुळे
दरम्यान, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांचा उद्याचा परभणी दौरा ही नौटंकी आहे. त्यामुळे त्यांनी अशी नौटंकी करण्यापेक्षा समाजाला न्याय देण्यासाठी काम केलं पाहिजे, असं बावनकुळे म्हणाले.