मोठ्या प्रतिक्षेनंतर मॉन्सूनने अखेर मराठवाड्यात (Marathwada) हजेरी लावली आहे. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि लातूरपर्यंत काल रात्री चांगल्या पावसाला सुरूवात झाली आहे. आता सर्व मराठवाड्यात हा पाऊस दाखल होईलअसा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.
मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी आज ढगाळ वातावरण होते. नांदेड जिल्ह्यातील उमरी, देगलूर, बिलोली, भोकर, लातूर जिल्ह्यांतील जळकोट, हिंगोलीच्या सेनगाव परिसरात वादळी वाऱ्यासह तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
विदर्भासह मराठवाडा मध्य महाराष्ट्रात वादळी पाऊस, हवामान विभागाचा अंदाज काय?
जालना शहरासह भोकरदन, बदनानापूर, घनसावंगी तालुक्यांच्या काही भागांत पावसाने हजेरी लावली. ठिकठिकाणी वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरात दुपारनंतर अचानक काळे ढग दाटून येत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला.
यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. पंचायत समिती विश्रामगृहासमोर झाडाची फांदी पडून एका चारचाकीचे नुकसान झाले. बालाजी विहार परिसरात पाण्याची टाकी उडून किरकोळ पडझड झाली. खुलताबाद आणि वैजापूर तालुक्यांतील काही भागांतही पाऊस झाला.
आज सकाळपासूनही पावसाचं वातावरण निर्माण झालं आहे. मराठवाड्यात अनेक तालुक्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. जवळपास दीड ते दोन तास सुरू असलेल्या या पावसामुळे रस्ते आणि शेतशिवारातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना दिसून आले. दरम्यान, जोरदार वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर अनेक भागांत विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. आता या पावसामुळं गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर या पावसामुळे परिसरातील तलावांमधील जलसाठ्यात वाढ झाल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.
